Published On : Wed, Jul 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात स्मार्ट मीटरवरून नागरिकांचा संताप; तक्रार निवारण शिबिरांत ग्राहकांची मोठी गर्दी

Advertisement

नागपूर : स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात होत असलेल्या कथित वाढीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरणने शहरातील २१ ठिकाणी तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडल्या. तुकडोजी चौक येथील शिबिरात ग्राहकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली.

शिबिरात आलेल्या अनेक ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज वापरात कोणताही लक्षणीय बदल नसतानाही युनिट आणि वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप केला. मागील वर्षीच्या तुलनेत वापर जवळपास तसाच असताना बिल मात्र दुपटीने वाढल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. याबाबत यापूर्वी तक्रारी करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

काही महिला ग्राहकांनी घरात एसी नसून केवळ कूलरचा वापर असतानाही हजारो रुपयांची वीजबिले येत असल्याची तक्रार केली. कमी वीज वापर असूनही बिलात कोणतीही घट दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

विशेष म्हणजे, केवळ स्मार्ट मीटरधारकच नव्हे तर पारंपरिक मीटरधारक ग्राहकांनीही जादा वीजबिल आणि मीटरमधील तांत्रिक त्रुटींबाबत तक्रारी नोंदवल्या. काहींनी १५ ते १८ हजार रुपयांपर्यंत वीजबिल आल्याचा दावा करत संताप व्यक्त केला.

Advertisement

दरम्यान, महावितरणकडून तक्रारी स्वीकारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात समाधानकारक तोडगा निघत नसल्याची भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली. त्यामुळे स्मार्ट मीटर आणि वाढीव वीजबिलाचा प्रश्न नागपुरात अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.