नागपूर : नागपुरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणातील १९ वर्षीय आरोपीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित आरोपीवर पोक्सो कायद्यान्वये गंभीर आरोप होते. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी त्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर त्याला नागपुरात आणून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.
कोठडीत असताना आरोपी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून, आत्महत्या की इतर काही कारणे, याचा तपास सुरू आहे.
मॅजिस्ट्रेट चौकशी सुरू
पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याने नियमानुसार न्यायिक दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. तसेच पोलिस कोठडीत आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचाही आढावा घेतला जात आहे.
या घटनेमुळे पोलिस यंत्रणेवर टीकेची झोड उठण्याची शक्यता असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाबाबत पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.









