नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी गुरुवारी आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून, यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाले आहे. या निर्णयानंतर शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील शिवानी दाणी, अश्विनी जिचकार आणि विशाखा मोहोड, तसेच प्रभाग २८ मधील निताताई राजेंद्र ठाकरे यांची नावे महापौरपदासाठी आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीची मतमोजणी पार पडून जवळपास सहा दिवस झाले असून, या काळात महापौरपद कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत प्रचंड उत्सुकता होती. काही राजकीय वर्तुळात यंदा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण निघेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अखेर नगरविकास विभागाने गुरुवारी काढलेल्या सोडतीत खुल्या अर्थात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील महिलांना आघाडी-
महापौरपदासाठी चर्चेत असलेल्या शिवानी दाणी (प्रभाग ३६), अश्विनी जिचकार (प्रभाग ३७) आणि विशाखा मोहोड (प्रभाग ३५) या तिन्ही नगरसेविका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे मागील २०१७ मध्येही भाजपची सत्ता स्थापन होताच सर्वप्रथम फडणवीस यांच्या मतदारसंघालाच महापौरपद मिळाले होते. त्यामुळे यावेळीही त्याच मतदारसंघातील महिला नगरसेविकेला संधी दिली जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
अनुभवी महिला नगरसेविकांचीही नावे पुढे-
याशिवाय भाजपच्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका नीता ठाकरे, दिव्या धुरडे, मंगला खेकरे आणि साधना बरडे यांची नावेही संभाव्य महापौर म्हणून पुढे येत आहेत. संघटनात्मक अनुभव, प्रशासनाशी समन्वय आणि पक्षातील ज्येष्ठत्व या मुद्द्यांवर या नावांचा गांभीर्याने विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
भाजपचे निर्विवाद बहुमत, निर्णय सोपा पण उत्सुकता कायम-
महानगरपालिका निवडणुकीत भाजपने १०२ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौरपद कोणाच्या हाती जाणार, हा निर्णय पूर्णतः भाजप नेतृत्वावर अवलंबून आहे. राज्यात आणि नागपुरातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सूत्रधार राहणार असल्याने, अंतिम निर्णय त्यांच्या भूमिकेवर ठरणार आहे.
महापौरपदाच्या आरक्षणाचा मागोवा-
गेल्या पंधरा वर्षांत नागपूरमध्ये विविध प्रवर्गांना महापौरपदाची संधी मिळाली आहे.
२००७ ते २००९ – अनुसूचित जमाती
२००९ ते २०१२ – सर्वसाधारण महिला
२०१२ ते २०१४ – सर्वसाधारण
२०१४ ते २०१७ – ओबीसी (सर्वसाधारण)
२०१७ ते २०१९ – सर्वसाधारण महिला
२०१९ ते २०२२ – सर्वसाधारण
२०२६ ते पुढील अडीच वर्षे – सर्वसाधारण महिला
दरम्यान महापौरपद पुन्हा एकदा महिलांसाठी आरक्षित झाल्याने नागपूरच्या राजकारणात महिला नेतृत्वाला नवी संधी मिळाली आहे. आता शिवानी दाणी, अश्विनी जिचकार, विशाखा मोहोड, निताताई ठाकरे यापैकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.









