
नागपूर : प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्री आणि वाहतुकीविरोधात कारवाई करताना नागपूर ग्रामीण पोलिसांनी थेट त्याच्या उत्पादन केंद्रापर्यंत धडक दिली आहे. दादरा आणि नगर हवेली येथील औद्योगिक परिसरातील मार्मिक इंडस्ट्रीजमध्ये नायलॉन मांजा तयार होत असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तयार नायलॉन मांजा, उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, पॅकिंग साहित्य आणि कच्च्या मालासह एकूण ६ कोटी २६ लाख ४३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि कागदपत्रांच्या आधारे तपास केला.
८ डिसेंबर २०२५ रोजी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोंडखैरी येथील व्ही.आर.एल. लॉजिस्टिक्स यार्डमध्ये एका कंटेनरमधून प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या १,२०० प्लास्टिक चकऱ्या जप्त करण्यात आल्या होत्या. या मांजाची किंमत १४ लाख ४० हजार रुपये, तर कंटेनरची किंमत २० लाख रुपये होती. या प्रकरणात कंटेनर चालक छविनाथ मोहन निषाद याला अटक करण्यात आली होती.
या घटनेचा तपास पुढे नेत पोलिसांनी मांजाच्या पुरवठा साखळीचा माग काढला. त्यातून दादरा आणि नगर हवेली येथील मार्मिक इंडस्ट्रीजपर्यंत पोहोचण्यात यश आले. न्यायालयाची परवानगी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने २१ ऑक्टोबर रोजी कारखाना परिसराची झडती घेण्यात आली.
या वेळी गोल्ड, शक्ती, कोब्रा, मोनोकाइट आणि हिरो प्लस या विविध ब्रँडच्या नावाने तयार करण्यात आलेला नायलॉन मांजा, तो तयार करण्यासाठी आणि चकऱ्यांवर गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे तसेच पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, ८८ हजारांहून अधिक चकऱ्यांसह सुमारे ५ कोटी ९ लाख ३ हजार १०० रुपयांचा तयार मांजा आणि जवळपास ९५ लाख रुपयांची यंत्रसामग्री व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईमुळे केवळ मांजाची वाहतूक करणाऱ्यांपुरता तपास मर्यादित न राहता त्याच्या उत्पादनाच्या स्रोतापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर ग्रामीण पोलीस करत आहेत.



