नागपूर : रेल्वे सुरक्षा दल आणि सीआयबी (क्राइम ब्रांच) यांच्या संयुक्त कारवाईत ट्रेन क्रमांक १२७२३ मधून पळून गेलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्हेगारांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह १ कोटी ५५ लाख रुपयांच्या चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.नागपूर आरपीएफची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. ११ फेब्रुवारी रोजी नागपूर रेल्वे पोलिसांना हैदराबाद पोलिसांकडून माहिती मिळाली की चोरीच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेले तीन आरोपी ट्रेन क्रमांक १२७२३ मध्ये प्रवास करत आहेत.
हैदराबाद पोलिसांनी संशयितांचे छायाचित्र शेअर केले. त्यानंतर आरपीएफ नागपूर पथकाचे प्रभारी नवीन प्रताप सिंह यांनी हेड कॉन्स्टेबल अजय सिकरवार आणि कॉन्स्टेबल जसवीर सिंग यांना ट्रेनमध्ये चढण्यास सांगितले.ट्रेनमध्ये प्रवास करताना, दोन्ही आरपीएफ अधिकाऱ्यांनी संशयितांना ओळखले. दरम्यान, आरपीएफ नागपूरचे प्रभारी सतेंद्र यादव यांच्या समन्वयाने सहाय्यक निरीक्षक प्रियंका सिंग आणि कॉन्स्टेबल रवींद्र जोशी यांना काटोल रेल्वे स्थानकावर पाठवण्यात आले.
ट्रेन काटोल स्टेशनवर पोहोचताच, तिन्ही आरोपींना पकडण्यात आले . त्यानंतर आरोपींना नागपूर आरपीएफ चौकीत आणण्यात आले. अटक केलेल्या आरोपींमध्ये सुशील सुरत मुखिया (२९,रा. बिरोल पोलीस स्टेशन, मधुबनी, बिहार), मल्हू सोनय (३८रा. बिरोल पोलीस स्टेशन, मधुबनी, बिहार) बसंती माखन आर्य (४५ रा. मेषनापूर, पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडून अंदाजे १.५५ कोटी रुपये किमतीचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये १९ लाख ६३ हजार ७३० रुपयांच्या भारतीय चलनासह २४ देशांच्या चलनांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिकन डॉलर, युरो, ब्रिटिश पाउंड, सौदी रियाल, पाकिस्तानी रुपया, व्हिएतनामी डोंग यांचा समावेश आहे. नागपूर रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त मनोज कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. चोरीच्या मालमत्तेसह तिन्ही आरोपींना हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.