Published On : Thu, Nov 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरकर भाजपच्या शक्तिप्रदर्शनासाठी वेठीस; पदयात्रेच्या गर्दीने रस्ते जाम, दिवाळीच्या खरेदीचा बट्ट्याबोळ!

रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्या, ७०० पोलिसांचा बंदोबस्तही ठरला अपुरा!
Advertisement

नागपूरकर भाजपच्या शक्तिप्रदर्शनासाठी वेठीस; पदयात्रेच्या गर्दीने रस्ते जाम, दिवाळीच्या खरेदीचा बट्ट्याबोळ!

नागपूर : राजकीय शक्तिप्रदर्शनाची हौस नेत्यांची; पण त्याची किंमत मोजावी लागली ती सर्वसामान्य नागपूरकरांना! भाजपच्या वतीने गुरुवारी काढण्यात आलेल्या ‘लोकशाही वाचवा’ पदयात्रेमुळे संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. विदर्भातील विविध जिल्ह्यांतून ५ हजारांहून अधिक वाहनांतून ३० ते ३५ हजार कार्यकर्ते नागपुरात दाखल झाल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दिवाळीच्या तोंडावर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. राजकीय कार्यक्रमासाठी शहरात एवढी मोठी गर्दी जमवताना सामान्य नागरिकांच्या गैरसोयीचा विचार कुणीच केला नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

छत्रपती चौकापासून मानकापूरपर्यंत तसेच वर्धा मार्गावरून शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला. जनता चौक ते संविधान चौक या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. कस्तुरचंद पार्क उड्डाणपूल, एलआयसी चौकातील उड्डाणपूल आणि आदिवासी गोवारी उड्डाणपुलावरही वाहनांची गर्दी उसळली. अनेक रस्त्यांवर वाहनचालकांना पुढे जाण्याचा मार्गच मिळत नव्हता. पदयात्रेसाठी आलेल्या वाहनांच्या गर्दीने शहरातील दैनंदिन वाहतूक अक्षरशः ठप्प झाली.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडले, पण रस्त्यांवरच अडकले-

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सीताबर्डी आणि धंतोलीच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. अशातच पदयात्रेमुळे वाहतुकीचे मार्ग अडवण्यात आल्याने बाजारपेठांकडे जाणेही कठीण झाले. पोलिसांनी अनेक मार्ग बंद केल्यामुळे नागरिकांना लांबचा वळसा घालावा लागला. कुटुंबासह खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक, ज्येष्ठ आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

रुग्णवाहिकांचा मार्गही अडवला; आपत्कालीन सेवांचे काय?

धंतोली आणि रामदासपेठ परिसरात अनेक मोठी खासगी रुग्णालये आहेत. या भागात आधीच सायंकाळच्या वेळी वाहतुकीचा ताण असतो. त्यात पदयात्रेमुळे निर्माण झालेल्या कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसला. राजकीय कार्यक्रमासाठी रस्त्यांवर गर्दी उसळत असताना आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि पुरेशी व्यवस्था होती का, हा गंभीर प्रश्न आहे. रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकांनाच अडथळे पार करावे लागत असतील, तर वाहतूक नियोजनाच्या दाव्यांचा उपयोग काय?

७०० पोलिसांचा बंदोबस्त कुठे गेला?

या पदयात्रेसाठी ७०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. वाहतूक कोंडी होणार नाही, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीने या दाव्यांची पोलखोल केली. प्रमुख चौक, उड्डाणपूल आणि बाजारपेठांकडे जाणारे मार्ग वाहनांनी भरून गेले. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही वाहतूक सुरळीत ठेवण्यात यंत्रणेला अपयश का आले, याचे उत्तर कोण देणार?

लोकशाही वाचविण्याच्या पदयात्रेत सामान्य जनतेच्या हालअपेष्टा मात्र दुर्लक्षित राहिल्या. राजकीय पक्षांना आपली ताकद दाखविण्याचा अधिकार आहे; मात्र त्या शक्तिप्रदर्शनासाठी संपूर्ण शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचा अधिकार कुणालाही नाही. पदयात्रा संपेल, कार्यकर्ते परत जातील; पण वाहतूक कोंडीत अडकून गेलेला वेळ आणि नागरिकांनी सोसलेला मनस्ताप भरून कोण देणार?

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.