Published On : Thu, Dec 28th, 2017

स्वच्छता सर्वेक्षणासाठी नागपूर सज्ज

Advertisement

नागपूर: ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत जानेवारी २०१८ मध्ये होणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’साठी नागपूर सज्ज झाले आहे. जनजागृतीचे विविध साधनांचा उपयोग करतानाच नागपूर महानगरपालिका हायटेक मीडियाचा वापर प्रभावीपणे करीत आहे. या अभियानात नागपूरकरांचा सहभाग वाढावा यासाठी मनपातील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी स्वत: रस्त्यावर उतरून स्वच्छतेसाठी जनजागृती करीत आहे.

‘स्वच्छ भारत’ अभियानाची सुरुवात झाल्यानंतर नागपूर महानगरपालिका प्रभावीपणे याचा प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नेमके काय होते, याची माहिती प्रत्येक नागरिकाला व्हावी, यासाठी मनपा गांभीर्याने कार्य करीत आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या नेतृत्वात मनपातील पदाधिकारी आणि नगरसेवक तर आयुक्त अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि कर्मचारी जीव ओतून यासाठी कामाला लागले आहेत.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नगरसेवक-अधिकारी उतरले रस्त्यावर

‘स्वच्छ सर्वेक्षणां’तर्गत स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे, त्यावरून तक्रारी पाठविणे यासोबतच लोकांचा सहभाग यात मिळविणे यावर अधिक गुणांकन आहे. नागपूर शहरात सुमारे ५५००० लोकांच्या स्मार्टफोनवर ॲप डाऊनलोड व्हावे, हे उद्दिष्ट आहे. यासाठी मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारीच नव्हे तर पदाधिकारी आणि नगरसेवक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आहेत. आतापर्यंत ३८ हजारांचा आकडा पार करण्यात यामुळे यश आले असून ज्यांनी ॲप डाऊनलोड केले नसेल त्यांनी तातडीने SWACHHATA MoHUA हे ॲप प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करावे आणि त्यावरून स्वच्छताविषयक तक्रारी पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वयंसेवी संस्था सरसावल्या

मनपाच्या खांद्याला खांदा लावून स्वयंसेवी संस्था ॲप डाऊनलोडचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत. शहरातील मॉल, बाजार यासारखी सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, सार्वजनिक कार्यक्रमात पोहचून स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते ॲप डाऊनलोड करून देण्यासोबतच स्वच्छ सर्वेक्षणाविषयी जनजागृती करीत आहेत.

सोशल मीडिया ठरत आहे प्रभावी माध्यम

स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचावा, स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे नेमके काय याबाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी नागपूर महानगरपालिका फेसबुक, ट्विटर, वॉटस्‌ॲप या माध्यमांचा वापर पहिल्यांदाच प्रभावीपणे करीत आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे बहुतांश नागरिकांपर्यंत स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश पोहचत असल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांचे वॉटस्‌ ॲप ग्रुप

‘स्वच्छ सर्वेक्षणा’दरम्यान केंद्रीय चमू लोकांना स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात प्रश्न विचारणार आहे. नागरिकांकडून जितकी सकारात्मक उत्तरे केंद्रीय परीक्षण चमूला जातील, तितके नागपूरचे गुणांकन वाढणार आहे. त्यामुळे लोकांना याबाबतची माहिती वॉटस्‌ ॲप ग्रुपच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे २५०० नागरिकांना ग्रुपमध्ये जोडण्यात आले असून प्रत्येक ग्रुपमध्ये स्वत: आयुक्त अश्विन मुदगल आणि अन्य अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. नागरिकांशी ते स्वत: वॉटस्‌ ॲप ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.

स्वच्छता ॲम्बेसेडरचे कार्यही उल्लेखनीय

स्वच्छता अभियानाचा उद्देश आणि संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने नागपूर शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सन्माननीय नागरिकांना ‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले आहे. प्रख्यात मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, हास्य कवी मधुप पांडेय, डॉ. उदय बोधनकर, मॅरेथानपटू डॉ. अमित समर्थ, पर्यावरण तज्ज्ञ कौस्तभ चॅटजी, रेडिओ जॉकी निकेता यांचा यात समावेश आहे. हे सर्व व्यक्ती आपआपल्या क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क साधून जनजागृती करीत आहेत.

Advertisement
Advertisement