Published On : Wed, Oct 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवर यंदा रावण दहनाचा ‘डबल धमाका’; ७५ वर्षांच्या परंपरेचा भव्य अमृतमहोत्सव!

७५ फुटांचा रावण, ६५ फुटांचा कुंभकर्ण अन् ५५ फुटांचा मेघनाद
Advertisement
नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवर यंदा रावण दहनाचा ‘डबल धमाका’; ७५ वर्षांच्या परंपरेचा भव्य अमृतमहोत्सव!

नागपूर : नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवरील ऐतिहासिक रावण दहन सोहळा यंदा ७५ वर्षांचा टप्पा गाठत असून, या अमृतमहोत्सवी वर्षात उत्सवाचा थाट अधिक भव्य होणार आहे. दरवर्षी दसऱ्याला होणाऱ्या या सोहळ्याचे यंदा खास आकर्षण म्हणजे मुख्य रावण दहनापूर्वीच चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सनातन धर्म युवक सभेच्या वतीने १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्यांदाच ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्ससह रामलीला-

यंदाच्या उत्सवाची सुरुवात १६ ऑक्टोबरला भजन जॅमिंगने होईल. त्यानंतर १७, १८ आणि १९ ऑक्टोबरला भव्य रामलीलेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्स आणि फायर शोच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग सादर केले जाणार आहेत. आयोजकांच्या दाव्यानुसार, अशा स्वरूपाची रामलीला प्रथमच सादर होणार आहे. या कार्यक्रमांना नागरिकांना विनामूल्य प्रवेश असेल.

७५ फुटांचा रावण, ६५ फुटांचा कुंभकर्ण-

अमृतमहोत्सवी वर्षातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भव्य रावण दहन. यंदा रावणाचा ७५ फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुंभकर्णाचा ६५ फूट आणि मेघनादाचा ५५ फूट उंच पुतळा उभारला जाणार आहे. २० ऑक्टोबरला मुख्य रावण दहन सोहळा पार पडेल. या कार्यक्रमासाठी देणगी पासच्या माध्यमातून प्रवेशाची व्यवस्था असेल.

मोहन भागवत, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण-

सनातन धर्म युवक सभेचे अध्यक्ष विनय ओबेरॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, पद्मश्री सत्यनारायण मोलवाल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

७५ वर्षांची परंपरा, नागपूरकरांना खास निमंत्रण-

या ऐतिहासिक सोहळ्याच्या माध्यमातून प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील आदर्श आणि मूल्ये समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे विनय ओबेरॉय यांनी सांगितले. नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ७५ वर्षांची ही परंपरा संस्मरणीय करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आणि पाचव्या दिवशी भव्य रावण दहन, अशा स्वरूपात यंदाचा कस्तूरचंद पार्कवरील उत्सव नागपूरकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.