नागपूर : नागपूरचा युवा ग्रँडमास्टर रौनक साधवानी याने आपल्या दमदार बुद्धिबळ कौशल्याची पुन्हा एकदा छाप पाडली आहे. नेदरलँड्समधील व्लिसिंगेन येथे १ ते ८ ऑगस्टदरम्यान झालेल्या प्रतिष्ठेच्या शेल्डेमंड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत रौनकने विजेतेपद पटकावले.
नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत रौनकने एकही सामना न गमावता तब्बल ७.५ गुणांची कमाई केली. संपूर्ण स्पर्धेत त्याने सातत्यपूर्ण आणि संयमी खेळ करत अव्वल मानांकनाला साजेशी कामगिरी केली.
टायब्रेकमध्ये रौनकचा बाजी-
स्पर्धेच्या अंतिम गुणतालिकेत रौनक साधवानी आणि इंग्लंडचा ग्रँडमास्टर डॅनियल हॉवर्ड फर्नाडिस या दोघांच्याही खात्यात ७.५ गुण होते. त्यामुळे विजेत्याचा निर्णय टायब्रेकच्या निकषांवर झाला. यात रौनकने बाजी मारत स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर केले.
स्पर्धेदरम्यान तब्बल ५.५ तास रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत रौनकच्या संयमाची आणि मानसिक ताकदीची कसोटी लागली. मात्र, कठीण परिस्थितीतही त्याने शांतपणे खेळ करत आपली पकड कायम ठेवली.
जगभरातील मातब्बर खेळाडूंचा सहभाग-
शेल्डेमंड स्पर्धेत विविध देशांतील ग्रँडमास्टर्स आणि इंटरनॅशनल मास्टर्स सहभागी झाले होते. त्यामुळे अशा मजबूत आंतरराष्ट्रीय मैदानात मिळवलेले रौनकचे विजेतेपद विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.
रौनकने स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडू म्हणून प्रवेश केला होता. मात्र, मानांकनाचा दबाव बाजूला ठेवत त्याने प्रत्येक फेरीवर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित केले आणि अखेर विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
देशासाठी आणखी जेतेपदे जिंकायची आहेत-
विजयानंतर रौनक साधवानीने आनंद व्यक्त केला. “शेल्डेमंड बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्याचा मला खूप आनंद आहे. या विजयामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून पुढील स्पर्धांसाठी आणखी चांगली तयारी करण्याची प्रेरणा मिळाली,” असे त्याने सांगितले.
कठीण प्रसंगी शांत राहणे आणि मिळालेल्या छोट्या संधींचे विजयात रूपांतर करणे महत्त्वाचे ठरल्याचेही रौनकने नमूद केले. टायब्रेक नेहमीच आव्हानात्मक असतात, मात्र यावेळी परिस्थिती आपल्या बाजूने राहिल्याचा आनंद असल्याचे त्याने सांगितले.
“अव्वल मानांकित असल्याचा दबाव असतो; पण मी एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. या दृष्टिकोनामुळे संपूर्ण स्पर्धेत स्थिर राहण्यास मदत झाली. माझ्या देशासाठी आणखी विजेतेपदे जिंकण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे रौनकने म्हटले.
रौनकच्या या यशामुळे नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा विजय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.




