Published On : Tue, Apr 2nd, 2019

नागपूर: अचानक एस्केलेटर सुरू झाले अन् उमा भारती घाबरल्या

नागपूर : बंद एस्केलेटरवरून चढून जात असताना अचानक ते सुरू झाल्यामुळे भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा उमा भारती घाबरल्या. त्या बेसावध असत्या तर तोल जाऊन पडण्याची वेळ आली असती. त्यानंतर या प्रकाराबाबत त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून लेखी तक्रार करीत यंत्रणेतील दोष दूर करण्याची तंबी दिली. ही घटना मंगळवारी दुपारी १२.३२ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर घडली.

भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष उमा भारती यांचे मंगळवारी दुपारी १२.२० वाजता रेल्वेगाडी क्रमांक १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेसने आगमन झाले. प्लॅटफार्मवर उतरून त्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात होत्या. त्यांच्यासाठी रेल्वेस्थानकावरील बॅटरी कार तैनात करण्यात आली होती. परंतु त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी उमा भारती यांना बॅटरी कारमध्ये बसवायचे सोडून बॅटरी कारमध्ये सामान टाकले. यावेळी बाजूलाच बंद असलेल्या एस्केलेटरवरून उमा भारती वर चढत होत्या. काही पावले चालून झाल्यावर अचानक बंद असलेले एस्केलेटर सुरु झाले. अचानक सुरु झाल्यामुळे उमा भारती घाबरल्या. त्या सावध असल्यामुळे त्यांनी लगेच तोल सांभाळला. अन्यथा त्या बेसावध असत्या तर तोल जाऊन पडल्या असत्या. त्यानंतर लगेच त्यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय गाठून घडलेल्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तक्रार पुस्तिका मागितली. त्यावर आपली तक्रार दाखल करून यंत्रणेतील दोष दूर करण्याची तंबी रेल्वे प्रशासनाला दिली. याबाबतीत रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कमालीची गुप्तता पाळली होती.

बुक स्टॉलवाल्याने केले एस्केलेटर सुरू

उमा भारती चढून जात असलेले एस्केलेटर त्या येण्यापूर्वी सुरू होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनीच ते बंद केले. एस्केलेटरवर त्या काही पावले चालून गेल्यानंतर बाजूला असलेल्या एका बुक स्टॉलवाल्याला उमा भारती जात असून एस्केलेटर बंद असल्याचे दिसले आणि त्याने बटन दाबून ते सुरु केले, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

स्पॉडिलायटीसचा त्रासामुळे लागला झटका


उमा भारती यांना स्पॉंडिलायटीसचा त्रास आहे. मंगळवारी दुपारी जीटी एक्स्प्रेसने आल्यानंतर त्या बंद एस्केलेटरवरून चढून वर जात होत्या. अचानक ते सुरु होऊन त्यांच्या पाठीला झटका लागला. यामुळे त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली.