Published On : Sat, Oct 1st, 2022

देशात दिव्यांग आणि ज्येष्ठांना सर्वाधिक सहाय्यक साधने नागपुरात प्रदान : ना. नितीन गडकरी

Advertisement

उत्तर नागपुरातील २७५४ दिव्यांग आणि ज्येष्ठांना नि:शुल्क सहाय्यक साधने वितरीत


नागपूर : रंजले गांजले, दीनदुबळ्यांची सेवा हिच ईश्वर सेवा असल्याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण आहे. राष्ट्रसंतांच्या या शिकवणीनुसार केंद्र शासनाच्या योजनेतून दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने आणि उपकरणे प्रदान करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ४० हजार लाभार्थ्यांना ४० कोटी रुपये किंमतीचे साहित्य प्रदान करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर आहे. नागपुरात देशातील सर्वाधिक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधने आणि उपकरणे प्रदान करण्याचा विक्रम झाल्याचा आनंद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी काढले.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण केल्या जात असून, नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शनिवारी १ ऑक्टोबर रोजी उत्तर नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, कार्यक्रमाचे संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, सुधीर दिवे, उपायुक्त रवींद्र भेलावे, सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता अजय मानकर, उज्ज्वल धनविजय, नागपूर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. संजय भेंडे, श्री. भोलानाथ सहारे, श्री. प्रभाकरराव येवले, इब्राहिम खान, सीआरसी चे श्री. प्रफुल्ल शिंदे, एलिम्को चे श्री. सेनगुप्ता, माजी नगरसेवक सर्वश्री गोपीचंद कुमरे, दिनेश यादव, शेषराव गोतमारे, माजी नगरसेविका सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, निरंजना पाटील, नसीम बानो शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रनिहाय लाभार्थ्यांना सहाय्यक साधने आणि उपकरणे वितरित करण्यात आले असून शनिवारी या शिबिराचा समारोप झाला. सर्व शिबिरांच्या यशस्वीतेसाठी ना. नितीन गडकरी यांनी सीआरसी, एलिम्को, मनपाचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, शिबिरात सेवा देणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांची वैद्यकीय चमू, स्वयंसेवी संस्था यांचे अभिनंदन केले व आभार मानले. ते म्हणाले, म्हातारपण आणि दिव्यांगत्व ही नैसर्गिक बाब आहे. या कठिण काळात आधार आवश्यक आहे. अशा स्थितीत प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून शहरातील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच आज सुमारे ४० हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि हास्याचे आपण कारण ठरले आहोत. याच शृंखलेत आता ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना धार्मिक स्थळांचे दर्शन करता यावे यासाठी ई-बसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय पूर्व नागपुरात १२ कोटी रुपये निधीतून सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे दिव्यांग पार्क साकारले जाणार आहे. विशेष म्हणजे, हे दिव्यांगांसाठी असलेले हे महाराष्ट्रातील पहिले पार्क असेल, असेही ते म्हणाले.

सहाय्यक साधने आणि उपकरणांची आवश्यकता असलेला शहरातील कुणीही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी कविवर्य सुरेश भट सभागृहात २ आणि ३ ऑक्टोबर रोजी शिबिर सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहर आणि जिल्ह्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा, येथील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुलभता यावी, यासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यात हे शिबिर घेण्यात येणार असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

आमदार प्रवीण दटके यांनी सहाय्यक साधनांच्या वितरणामुळे हजारो गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना मोठा आधार मिळाल्याचे प्रतिपादन केले. शिबिराच्या माध्यमातून दिले जात असलेल्या प्रत्येक साहित्य आणि उपकरणांच्या दर्जाकडे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी विशेष लक्ष दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी माजी नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले असून सर्वांच्या सहकार्याने सुमारे ४० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी शिबिराची संपूर्ण पार्श्वभूमी विषद केली. नागपूर शहरातील प्रत्येक लाभार्थी या योजनेने लाभान्वित व्हावा यासाठी ४१ दिवस कविवर्य सुरेश भट सभागृहात लाभार्थ्यांची नोंदणी आणि तपासणी करण्यात आली. यासाठी मनपाच्या आपली बस द्वारे निःशुल्क सेवा देण्यात आली. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मनपाच्या समाजविकास विभाग, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्वयंसेवी संस्थांनी देखील मोठे सहकार्य केल्याचे आयुक्तांनी सांगितले. या सर्व सहकार्य आणि समन्वयातून नागपूर शहराने देशात सर्वाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याचा आनंद असून पुढेही लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करून घेतले जाईल, अशी ग्वाही मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिली.

२७५४ लाभार्थ्यांना साहित्य वितरित

नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने नागपूर शहरातील दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात आले. उत्तर नागपुरातील २७५४ लाभार्थ्यांना (अडीप – ५२६ आणि वयोश्री – २२२८) २ कोटी ८७ लक्ष रुपयांचे साहित्य वितरित करण्यात आले.

यापूर्वी दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील ३९५० लाभार्थ्यांना (अडीप – ३७२ आणि वयोश्री – ३५७७) रु. ४ कोटीचे सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. मध्य नागपुरातील ३२२३ लाभार्थ्यांना साहित्य, उपकरणे वितरित करण्यात आले. दक्षिण नागपुरातील ९०१८ लाभार्थ्यांना ९.१९ कोटी रुपये किंमतीची (अडीप – ८५४, वयोश्री- ८१६४) साहित्य करण्यात आली. पूर्व नागपुरातील ४५४९ (अडीप – ५९०, वयोश्री- ३९५९) लाभार्थ्यांना साहित्य वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी केले व आभारदेखील त्यांनी मानले. मुकबधिरांसाठी कपील वासे यांनी सांकेतिक भाषेत संचालन केले.

प्रातिनिधीक स्वरूपात १० लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिरामध्ये केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय मा.श्री. नितीन गडकरी व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान करण्यात आली. यावेळी अश्विन शिशिका आणि रोशन अशोक यांना कृत्रिम पाय, केशव तिडके व इंदूबाई जवारे यांना श्रवणयंत्र, चंद्रप्रकाश गजभिये यांना स्मार्ट फोन आणि ब्रेल केन, आर्शिया कौसर यांना एमआर किट, आनंद जांभुळदार यांना पर्शियल डेंटल सेट, निता भुते यांना दातांची कवडी, पितांबर चित्रीवेकर यांना चष्मा, पुरुषोत्तम कुहिकर आणि तारा कुहिकर यांना व्हील चेअर वितरीत करण्यात आले.

राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात आलेली उपकरणे

वॉकिंग स्टिक

श्रवण यंत्र

एल्बो कक्रचेस

व्हीलचेअर

ट्रायपॉड्स

क्वॅडपॉड

कृत्रिम मर्डेचर्स

स्पेक्टल्स

क्वॅकपॉड

स्पेक्टल्स

एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात आलेली उपकरणे

वॉकिंग स्टिक

एल्बो कक्रचेस

एझलरी कक्रचेस (कुबडे)

कृत्रिम अवयव

श्रवण यंत्र

ट्रायपॉड्स

क्वैडपोड

व्हीलचेयर

ट्रायसिकल (मॅन्युअल)

ट्रायसिकल (बॅटरी)

कॅलीपस

TLM कीट

ब्रेल कीट (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट फोन (दृष्टीहिन करीता)

डेजी प्लेयर (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट केन (दृष्टीहिन करीता)