नागपूर :नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून एका 34 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी प्रितम लावणकर याच्याविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची ओळख आरोपी प्रितम लावणकर याच्याशी एका ऑनलाइन विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि काही वेळा भेटीगाठीही झाल्या.
तक्रारीनुसार, 17 मे रोजी आरोपीने महिलेला बजाजनगर परिसरातील एका निर्जन ठिकाणी बोलावले. तेथे लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि तेथून दोघेही निघून गेले.
यानंतर आरोपीचे दुसऱ्या एका तरुणीसोबतही संबंध असल्याचे महिलेला समजले. याबाबत जाब विचारल्यावर आरोपीने तिच्याशी शिवीगाळ केल्याचा आरोपही तिने तक्रारीत केला आहे.
महिलेच्या तक्रारीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.





