नागपूर: पारडी परिसरात एका किरकोळ गंमतीमुळे मोठी घटना घडली आहे. मोबाईल लपवण्याच्या मजेतून सुरू झालेल्या वादात, संतापलेल्या तरुणाने आपल्या मित्राच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची हत्या केली. ही हृदयद्रावक घटना नवीन नगरमधील एनआयटी गार्डनजवळ घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत युवकाचे नाव जितेंद्र उर्फ जितू राजू जयदेव असून, आरोपी इतवारीदास शिवदास माणिकपुरी हा त्याचा जुना मित्र आहे. दोघेही मजुरी करून उपजीविका करतात. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता जितू नवीन नगरमध्ये आपल्या मित्रांशी भेटायला गेला होता. गार्डनजवळ गप्पा सुरू असताना इतवारीदासचा मोबाईल कोणी तरी गंमतीने लपवला. मोबाईल सापडत नसल्याने इतवारीदास चिडला आणि त्याने जितूवर संशय घेतला.
जितूने मोबाईल घेतल्याचे नाकारल्यावर वाद वाढला आणि दोघांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. याच वेळी जितूने इतवारीदासला चापट मारली. अपमानित झालेल्या इतवारीदासने नंतर ‘पाहून घेतो’ असे म्हणत तिथून निघून गेला. काही वेळातच तो सेंट्रिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या लोखंडी रॉडसह परत आला आणि पाठीमागून जितूच्या डोक्यावर जबरदस्त वार केला. त्यानंतर सलग दोन-तीन वार करत त्याला गंभीर जखमी केले.
सहकाऱ्यांनी हस्तक्षेप करून हल्ला थांबवला आणि जितूला तातडीने मेयो रुग्णालयात नेले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी इतवारीदासला अटक केली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.