Published On : Tue, May 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांची ”ऑपरेशन थंडर” अंतर्गत  मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांनी घेतली मोहीमेची धुरा”

Advertisement

नागपूर – शहरातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी “ऑपरेशन थंडर” अंतर्गत नागपूर पोलिसांनी मागील एका महिन्यात धडक कारवाई करत तब्बल 28 ठिकाणी रेड टाकून 1 किलो 400 ग्रॅम एमडी17 किलो गांजा आणि अफू असा 1 कोटी 31 लाख 56 हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत 47 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांविरोधातील ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांनी यंत्रणेतील शिथिलता टाळण्यासाठी थेट मैदानात उतरून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. 19 मे रोजी त्यांनी जरीपटका आणि यशोधरा नगर परिसरात अचानक भेट देत पेट्रोलिंग केले. यावेळी खोब्रागडे चौकात असलेल्या एका पानठेल्यावर बेकायदेशीर गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित पानठेला चालकाकडून राजश्री, विमल, रजनीगंधा, बाबा, केपी ब्लॅक लेबल यांसारखा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉ. सिंगल यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण शिरसागर यांना तात्काळ फटकारले व अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यांनी रस्त्यावर गर्दी करणारे वाहनचालक, वाईन शॉप जवळील अंडे विक्रेते, प्लास्टिक ग्लास विक्रेते यांच्यावर देखील कारवाई करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांना हटवले.

यानंतर त्यांनी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात अचानक भेट देत येथील कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी भिलगाव परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या खुनाच्या प्रकरणातील संशयितांची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच दारू गुत्ते, झिंगणारे व्यक्ती, गुटखा विक्रेते, हुज्जतबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

पोलीस आयुक्तांनी स्पष्ट संदेश दिला – “जर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करू शकतो, तर स्थानिक वरिष्ठ अधिकारी का नाही?” ही त्यांची कार्यपद्धती पोलिस खात्यातील हलगर्जीपणाला धक्का देणारी असून, नागपूर पोलीस दलाला पुन्हा एकदा विश्वासार्हतेच्या मार्गावर नेणारी ठरत आहे.

Advertisement
Advertisement