नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या कोठडीत एका आरोपीने आत्महत्या केल्याची गंभीर घटना गुरुवारी उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नरेंद्र भाटिया असे मृत आरोपीचे नाव असून, दोन दिवसांपूर्वी त्याला पॉस्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती.
पोलीस कोठडीत रात्री असताना, झोपेसाठी दिलेली चादर फाडून आरोपीने गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. घटनेच्या वेळी पोलीस ठाण्यात नाईट ड्युटीवर चार अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.
पहाटेच्या सुमारास ही बाब निदर्शनास येताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. तातडीने वरि
ष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान, मृत आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली होती.
या घटनेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाल्याने, एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन आत्राम (नाईट ड्युटी अधिकारी), अभय खडसे (ठाणा हजेरी व लॉकअप इन्चार्ज), तसेच लॉकअप गार्ड म्हणून कार्यरत प्रमोद दूधकवरे आणि राहुल चव्हाण यांचा समावेश आहे.
प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, विभागीय चौकशीचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत.








