चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर आला असून पक्षातील गटबाजी टोकाला पोहोचल्याचे चित्र आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या 27 पैकी 13 नगरसेवकांना सोबत घेत नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या हालचालीची माहिती मिळताच काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी तातडीने विभागीय आयुक्त कार्यालय गाठत या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून ही नोंदणी करण्यात आल्याचा दावा करत, यास मान्यता देऊ नये, अशी भूमिका वडेट्टीवार गटाकडून मांडण्यात आली. त्यामुळे आता या दोन्ही गटांच्या परस्पर दाव्यांवर विभागीय आयुक्त मंगळवारी निर्णय देणार आहेत.
दरम्यान, शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या घडामोडींनंतर संध्याकाळी काँग्रेसमधील मतभेद उघड झाले. नागपुरात दाखल झालेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धानोरकर व वडेट्टीवार यांच्याशी स्वतंत्र चर्चा करत गटनेत्याचे नाव लवकरच जाहीर करण्याचे संकेत दिले होते. मात्र गटनेतापदावर एकमत न झाल्याने निर्णय प्रलंबित राहिला.
विजय वडेट्टीवार गटाकडून वसंता देशमुख यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र त्याला प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला. तर धानोरकर गटाकडून सुरेंद्र अडबाले यांचे नाव पुढे करण्यात आले होते, ज्याला वडेट्टीवारांनी नकार दिला. अखेर संध्याकाळी प्रतिभा धानोरकर यांनी 13 नगरसेवकांसह थेट विभागीय आयुक्त कार्यालय गाठत काँग्रेस गट स्थापनेची नोंदणी केली.
13 नगरसेवकांचा दावा; अल्पमतावरून आक्षेप
धानोरकर गटाने आपण प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसारच गट स्थापन केल्याचा दावा केला असून, 27 नगरसेवकांच्या नावाचे पत्र आणि गटनेता म्हणून सुरेंद्र अडबाले यांचे नाव सादर करण्यात आले आहे. मात्र वडेट्टीवार गटाने याला कडाडून विरोध करत, 13 नगरसेवकांचा गट अल्पमतात असल्याने त्यास मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे. यासाठी 14 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आले आहे.
महानगरपालिकेतील सध्याचे संख्याबळ
चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण 66 नगरसेवक असून सध्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे –
भाजप : 23
काँग्रेस : 27
काँग्रेस समर्थित जनविकास सेना : 3
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : 6
वंचित बहुजन आघाडी : 2
बसपा : 1
शिवसेना (शिंदे गट) : 1
अपक्ष : 2
एमआयएम : 1
काँग्रेसमधील या गोंधळाचा राजकीय फायदा भाजप उचलण्याची शक्यता व्यक्त होत असून, आता सर्वांचे लक्ष विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे लागले आहे.









