Published On : Wed, Sep 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

धम्मचक्र प्रवर्तन दिनासह नवरात्रोत्सवासाठी नागपूर पोलिसांचा ‘मेगा’ सुरक्षा प्लॅन; लाखोंच्या गर्दीसाठी जय्यत तयारी

Advertisement

धम्मचक्र प्रवर्तन दिनासह नवरात्रोत्सवासाठी नागपूर पोलिसांचा ‘मेगा’ सुरक्षा प्लॅन; लाखोंच्या गर्दीसाठी जय्यत तयारी

नागपूर : आगामी ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरू केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस विभागासह महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, NIT, महावितरण तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

येत्या ११ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात, तर २० ऑक्टोबरला ७०वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी साजरी होणार आहे. या काळात नागपुरात मोठ्या संख्येने भाविक आणि अनुयायी दाखल होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा व नागरिकांच्या सुविधांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दीक्षाभूमी, बजाजनगर, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि भिलगावातील नागलोक या प्रमुख ठिकाणी लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे, धार्मिक स्थळे, मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले.

यासोबतच वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, CCTV निगराणी, पेयजल, स्वच्छता, वीजपुरवठा, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम ठेवण्यावर भर देण्यात आला. नवरात्रोत्सवादरम्यान गरबा, दांडिया, देवी विसर्जन मिरवणुका आणि सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणीही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यासोबतच सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी उत्सव शांततेत आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करावा तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.