Published On : Fri, Jul 3rd, 2020

नागपुरात पोलिसांनी अपहरण, हत्येचा कट उधळा

नागपूर : प्रेयसीला दुसरीकडे कनेक्ट करून दिल्यामुळे संबंधित तरुणावर सूड उगवण्यासाठी एका कुख्यात गुन्हेगाराने त्याच्या ओळखीच्या तरुणाचे अपहरण करून हत्येचा कट रचला. त्यानुसार चार गुंडांनी संबंधित तरुणाला रस्त्यावरून जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसविले. त्याला लकडगंजमधील निर्जन ठिकाणाकडे घेऊन निघाले; मात्र रस्त्यावरच्या बीट मार्शलने प्रसंगावधान दाखवून आरोपींचा पाठलाग केला.

त्यामुळे सदर तरुणाचा जीव वाचला आणि एक मोठा गंभीर गुन्हा टळला.

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या सेंट्रल एव्हेन्यूवर गुरुवारी रात्री हे थरारनाट्य घडले. त्यानंतर शेख इरफान शेख रहेमान (वय २७) या तरुणाने गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. इरफान शांतीनगरच्या आरपीएफ क्वॉर्टरमागे राहतो. तो आरटीओ एजंट आहे. आरोपी विजय हरिचंद्र चव्हाण हा त्याच भागात राहतो. तो कुख्यात गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वीच तो हत्या प्रकरणातून जामिनावर कारागृहातून बाहेर आला आहे. मार्चमध्ये इरफानने विजयच्या प्रेयसीची दुसऱ्या एका मित्रासोबत ओळख करून दिली.


तेव्हापासून प्रेयसीने विजयला झटकले आणि ती दुसºया तरुणासोबत फिरू लागली. इरफानमुळेच आपली प्रेयसी हातून गेली, याचा राग आरोपी विजयच्या मनात होता. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात इरफानला गाठले आणि आपल्या प्रेयसीला दुसºयासोबत का कनेक्ट करून दिले, असा प्रश्न करून त्याला मारहाण केली. यावेळी इरफाननेही आपले साथीदार बोलावल्यामुळे वाद वाढला. त्यानंतर विजयने इरफानला ‘तेरा फायनल गेम करुंगा’, अशी धमकी दिली.

आरोपी विजय हा कुख्यात गुन्हेगार असून तो नेहमीच गुन्हे करतो. त्याची एक टोळी असल्याचे माहीत असल्यामुळे तो गेम करू शकतो, हे ध्यानात आल्याने इरफानने शांतीनगरातील घर सोडले. तो ताजबागमध्ये राहू लागला. तिकडे विजय इरफानचा शोध घेत होता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री ७ वाजता इरफान आणि त्याचा मित्र इम्रान खान हे दोघे सेवासदन चौकातील एका दुकानासमोर वाहनाची कागदपत्रे घेऊन आले.

तेथे गप्पा करीत असताना आरोपी विजय चव्हाण, शेख आरिफ ऊर्फ पहिलवान, शोबी शेख सतरंजीपुरा आणि हे चौघे दोन दुचाकीवर आले. त्यांनी इरफानला चाकू दाखवून मारहाण केली आणि अश्लील शिवीगाळ करत त्याला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले. त्याचा मोबाईल हिसकावून घेतला.

आरोपींचे मनसुबे लक्षात आल्यामुळे सेंट्रल एव्हेन्यूवरून आरोपी त्याला घेऊन जात असताना इरफान जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागला. यावेळी गस्तीवर असलेल्या तहसील पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल गगन यादव आणि अजित ठाकूर यांनी त्याचा आवाज ऐकला. प्रसंगावधान राखत बीट मार्शल यादव आणि ठाकूर या दोघांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. पोलीस मागे लागल्याचे लक्षात येताच आरोपींनी आपल्या दुचाकीचे एका वळणावर करकचून ब्रेक दाबले.

ती संधी साधून इरफानने दुचाकीवरून खाली उडी घेतली. त्यानंतर आरोपी पळून गेले. नंतर इरफानने दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी आरोपी विजय चव्हाण आणि साथीदाराविरुद्ध अपहरण करून लुटमार करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

३० हजारांचा रिवॉर्ड
बीट मार्शल यादव आणि ठाकूरच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा गुन्हा टळला. ही माहिती कळताच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुरुवारी रात्री बीट मार्शल यादव आणि ठाकूरचे अभिनंदन केले आणि त्यांना ३० हजार रुपयांचा कॅश रिवॉर्ड जाहीर केला.