नागपूर : नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आणि पोलिस दलात शिस्तबद्धता प्रस्थापित करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी मोठी कारवाई केली आहे. बुधवारी तिन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चार पोलिस कॉन्स्टेबल्सना बडतर्फ करण्यात आले असून, एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. संबंधित पोलिसांवर गंभीर गैरवर्तन आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे आरोप आहेत.
पहिल्या प्रकरणात कलमणा पोलिस ठाण्यातील तत्कालीन सिपाही संदीप यादव आणि पंकज यादव यांनी एका १९ वर्षीय इंजिनीयरिंग विद्यार्थ्याला खोट्या पॉक्सो प्रकरणात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून १.८० लाखांची सोन्याची साखळी जबरदस्तीने घेतली होती. या प्रकरणात मोबाईल लोकेशन व सोशल मीडियावरील छायाचित्रांच्या आधारे आरोपींची ओळख पटली होती. विभागीय चौकशीत दोषी आढळल्यानंतर पोलिस आयुक्तांनी या दोघांनाही तत्काळ सेवेतून बडतर्फ केलं.
दुसऱ्या प्रकरणात कलमणा पोलिस ठाण्याचेच सिपाही मनोज घाडगे आणि भूषण साकडे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये हे दोघे पोलीस चौकीच्या आत जुगार खेळताना व धूम्रपान करताना दिसून आले. पोलिस दलाच्या प्रतिमेला गंभीर धक्का बसवणाऱ्या या प्रकारात चौकशीदरम्यान दोष सिद्ध झाल्यानंतर त्यांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.
तिसऱ्या प्रकरणात मुख्यालयात कार्यरत असलेल्या सिपाही मोहसिन खान याला एका तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न आणि तिच्या आईशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, मोहसिन खान आणि त्याचे तिघे साथीदार अटकेत आहेत. प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेऊन पोलिस आयुक्तांनी त्याला तत्काळ निलंबित केलं आहे.
या कठोर कारवायांनी आयुक्त डॉ. सिंगल यांनी पोलिस दलात शिस्त, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे धोरण अधोरेखित केलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पोलिस विभागामध्ये प्रामाणिकपणा आणि शिस्त सर्वोच्च असून, दोषींवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही.” या निर्णयांमुळे नागपूर पोलिस दलाची विश्वसनीयता आणि जनतेचा विश्वास वाढवण्यास मदत होणार आहे.