Published On : Thu, Jul 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दारू पार्टीवर छापा टाकणाऱ्या पोलिसांवर हल्ला; जवानाला चापट मारणारा आरोपी अटकेत

सरकारी कामात अडथळा, मारहाणसह जीवे मारण्याची धमकी
Advertisement

नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरंग भोजनालयात मध्यरात्री सुरू असलेल्या कथित दारू पार्टीची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी पोहोचलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कारवाईदरम्यान एका आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत त्याला थप्पड मारल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून आणखी एका व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता नवरंग भोजनालयात काही जण मद्यपान करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-३ला मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू केली.

यावेळी अंबाझरी येथील मरारटोली परिसरातील रहिवासी मनोज राजेश उईके (वय ३२) याने पोलिसांच्या कारवाईला विरोध करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने एका पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धक्काबुक्की केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याला आवरण्यासाठी पुढे सरसावलेल्या इतर पोलिसांशीही त्याने झटापट केल्याचे पोलिसांनी नमूद केले.

परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांचे अतिरिक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अतिरिक्त पोलिस आल्यानंतरही आरोपीने आक्रमक भूमिका कायम ठेवत एका पोलिस कर्मचाऱ्याला थप्पड मारली आणि पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

Advertisement

या प्रकरणी पोलिसांनी मनोज राजेश उईके याला अटक केली असून कौशल नगर येथील सुधाकर दत्तूजी तलवे (वय ६५) यांच्याविरुद्धही सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण, धमकी देणे आदी कलमांखाली गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.