नागपूर : शहरातील अमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने पाचपावली परिसरात कारवाई केली. बुद्धनगर येथे सापळा रचून पोलिसांनी अनुराग रामटेककर (२३) याला १२.६५० ग्रॅम एमडी पावडरसह अटक केली. त्याच्याकडून मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि मोपेड असा एकूण ९३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रविवारी रात्री १२.२० ते २.१० वाजताच्या सुमारास अंमली पदार्थविरोधी पथक बुद्धनगर परिसरात गस्तीवर होते. यावेळी पोलिसांना एमडी विक्रीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार प्रीतमसिंग ठाकूर यांच्या घरासमोर पोलिसांनी पाळत ठेवली. काही वेळाने मेस्ट्रो मोपेडवरून आलेल्या अनुरागच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडे जिपलॉक पिशवीत १२.६५० ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. चौकशीत त्याने एमडी विक्रीसाठी साथीदारांकडून आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात जावेद खान (३०), रा. हसनबाग आणि चंदा ठाकूर, रा. शांतिनगर यांची नावे समोर आली असून, दोघांचा शोध सुरू आहे.
पाचपावली पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. एमडीचा पुरवठा कुठून झाला आणि या अमली पदार्थांच्या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई डीसीपी दीपक अग्रवाल आणि एसीपी वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भारत क्षीरसागर व त्यांच्या पथकाने केली.




