नागपूर – पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीची अनोळखी आरोपींनी दगडाने ठेचून हत्या केली. कमाल चाैक, भाजीबाजार परिसरात सोमवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.
कमाल चाैकाजवळ भरणाऱ्या भाजीबाजाराची ठराविक वेळ असल्याने सायंकाळनंतर भाजीबाजार परिसरात अंधाराचे साम्राज्य असते. तेथे भिकारी, कचरा वेचणारे आणि नशेखोर जमतात. ते तेथे वेगवेगळी नशा करीत बसतात. सोमवारी रात्री अशाच प्रकारे एका जणाची आरोपीने दगडाने ठेचून हत्या केली. आरडाओरड ऐकून बाकीचे तेथून पळून गेले. रात्री ८.३० च्या सुमारास एकाने ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पाचपावली पोलीस तेथे पोहचले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने तेथे आपापल्या ताफ्यासह पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर मरणारा आणि मारणारा कोण, ते स्पष्ट झाले नव्हते. पाचपावली आणि गुन्हे शाखेची पथके स्वतंत्रपणे मृत आणि आरोपीची ओळख पटविण्यासाठी कामी लागली होती.