Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Apr 2nd, 2020

  सरकारच्या आवाहनानंतर नागपुरात तेलाचे भाव निश्चित

  नागपूर : लॉकडाऊननंतर बाजारात खाद्यतेलाची मागणी वाढली असून नागरिकांनी वाजवीपेक्षा जास्त खरेदी केली. कच्चा माल नसल्याने होलसेलमधून किरकोळमध्ये खाद्यतेलाची आवक कमी झाली. त्यामुळे किरकोळमध्ये भाव वाढले. सध्या खाद्यतेलाचे प्रकल्प आणि पॅकिंग सुरू झाली असून बाजारात मुबलक प्रमाणात तेल उपलब्ध होणार आहे. सरकारच्या आवाहनानंतर तेलाचे भाव निश्चित केले असून त्याच भावात किरकोळ विक्रेत्यांना विक्री करायची असल्याची माहिती ऑईल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर यांनी दिली.

  ठक्कर म्हणाले, असोसिएशनच्या ३१ मार्चच्या बैठकीत तेलाचे दर निश्चित केले आहेत. तेलाचा काळाबाजार होणार नाही आणि ग्राहकांना ठराविक किमतीत तेल खरेदी करता येईल. व्यापाऱ्यांवर साठेबाजीचा आरोप होऊ नये म्हणून असोसिएशनने १ ते १० एप्रिलपर्यंत होलसेल आणि सेमी होलसेलकरिता शेंगदाणा तेल (१५ किलो) २२५० रुपये, सोयाबीन रिफाईन्ड तेल (१५ किलो) १६०० रुपये आणि सनफ्लॉवर रिफाईन्ड तेल (१५ किलो) १६०० रुपये दर निश्चित केले आहेत. या दरातच व्यापाऱ्यांना तेलाची विक्री करायची आहे. ठक्कर म्हणाले, नागपुरात ६५ टक्के सोयाबीन तेलाची विक्री होते. उर्वरित ३५ टक्क्यांमध्ये सर्व तेलांचा समावेश आहे.

  मालवाहतूक सुरू झाल्याने प्रकल्पांना सोयाबीन मिळू लागले आहे. आमच्याही स्वाद ब्रॅण्डसाठी सोयाबीन उपलब्ध झाले असून पॅकिंग प्रकल्प सुरू झाला आहे. दोन दिवसात गुजरातमधून शेंगदाणा नागपुरात येणार आहे. त्यामुळे शेंगदाणा तेलाची उपलब्धता वाढणार आहे. लवकरच तेलाचा मुबलक साठा बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पॅनिक न होता लोकांनी आवश्यक तेवढीच खरेदी करावी. कुणी विक्रेते निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने तेलाची विक्री करीत असेल तर त्या व्यापाऱ्याची असोसिएशन विभागाकडे तक्रार करणार आहे. शिवाय असोसिएशन त्या व्यापाऱ्यावर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावणार आहे. याशिवाय जास्त दरात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची ग्राहकांना असोसिएशनकडे तक्रार करता येईल, असे ठक्कर यांनी स्पष्ट केले. बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाने व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला. व्यापाऱ्यांवर अनावश्यक कारवाई होत राहिल्यास असोसिएशन दुकाने बंद करतील, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

  ठक्कर म्हणाले, कोरोनाची भीती असतानाही व्यापारी दुकाने सुरू ठेवून ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यानंतरही व्यापाऱ्यांवर साठेबाजीचा आरोप होत आहे. हा आरोप चुकीचा आहे. व्यापारी संकटसमयी प्रशासनाला मदत करीत आहे आणि पुढेही करणार आहे. सभेत असोसिएशनचे पदाधिकारी पुरुषोत्तम फुलवानी, सतीश रुठीया व सदस्यांसह गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी व पंकज घाडगे आणि वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक धनवंत कोवे आणि सहायक नियंत्रक जुमडे उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145