
मुंबई : राज्य शासनाने महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेत विपीन इटनकर (भा.प्र.से.) यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ५ मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले. विशेष म्हणजे, आयुक्तपद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून त्यावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीनंतर शहरात नव्या पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारताच हा बदल करण्यात आला. यापूर्वी आयुक्तपदावर कार्यरत असलेले Abhijit Chaudhari यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे.
दुहेरी जबाबदारी-
सध्या नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. इटनकर यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभारही कायम राहणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाची दुहेरी धुरा त्यांच्या खांद्यावर येणार आहे.
तात्काळ कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश-
सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, नव्या पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारून त्याची नोंद Supremo प्रणालीवरील ईआर शीटमध्ये (Posting कॉलम) अद्ययावत करणे बंधनकारक आहे. तसेच, १७ नोव्हेंबर २०२० रोजी जारी करण्यात आलेल्या कार्यभार हस्तांतरणासंबंधीच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नव्या पदस्थापनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल व कार्यमूल्यांकन अहवाल वेळेत सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर ई-ऑफिस आणि e-HRMS प्रणालीचा प्रभावी वापर वाढविण्यावर भर देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनात गतीची अपेक्षा-
डॉ. इटनकर यांच्या नियुक्तीमुळे नागपूर महापालिकेच्या कामकाजाला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि नागरिकाभिमुख निर्णय प्रक्रियेला कितपत गती मिळते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.








