Published On : Thu, Aug 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘आम्ही पैसे देण्याच्या स्थितीत नाही’; निर्मल उज्ज्वलच्या संचालकांचा व्हिडिओ, ठेवीदारांच्या चिंतेत आणखी भर

Advertisement

नागपूर : निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील कथित आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या प्रमुखांचा एक व्हिडिओ संदेश समोर आला आहे. या संदेशात आम्हाला चिरून काढल तरीही सध्या आम्ही पैसे देण्याच्या परिस्थितीत नाही. आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत. कुठेही पळून गेलेलो नाही. आमचे कार्यालय बंद झालेले नाही. आम्ही नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत,” असे पूजा प्रमोद मनमोडे म्हणताना दिसत आहेत.

निर्मल उज्ज्वल पतसंस्थेतील कथित गैरव्यवहाराच्या तपासात विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक गंभीर अनियमितता नमूद करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांच्या सुमारे 51.70 कोटी रुपयांच्या ठेवींशी संबंधित कथित गैरव्यवहार, संचालक पदाचा गैरवापर, कुटुंबीयांच्या व्यवसायांना नियमबाह्य कर्जवाटप, एकाच मालमत्तेवर दुहेरी तारण आणि कर्जाच्या रकमेचा कथित वळवणूक यांसारखे मुद्दे तपासात समोर आल्याचे एसआयटीने म्हटले आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पार्श्वभूमीवर पूजा प्रमोद मनमोडे यांच्या व्हिडिओ संदेशामुळे ठेवीदारांच्या अपेक्षा आणि प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. ठेवीदारांचे पैसे नेमके कधी परत मिळणार? परतफेडीसाठी संस्थेचा ठोस आर्थिक आराखडा काय आहे? सध्याची आर्थिक परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

‘कुठेही पळून गेलेलो नाही-
व्हिडिओ संदेशात पूजा मनमोडे यांनी संस्थेचे कार्यालय सुरू असल्याचे सांगत, नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्याचा दावा केला आहे. तसेच संस्थेची परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या संस्था ठेवीदारांना पैसे देण्याच्या परिस्थितीत नाही आणि प्रकरणासंदर्भात कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यामुळे ठेवीदारांना परतफेडीसाठी किती कालावधी लागणार, याबाबत मात्र स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

एसआयटीच्या आरोपपत्रामुळे आधीच गंभीर प्रश्न-
एसआयटीच्या आरोपपत्रानुसार, संस्थेशी संबंधित कुटुंबीयांच्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात आल्याचे, कर्मचाऱ्यांच्या नावावर मंजूर कर्जाची रक्कम संबंधित व्यवसायांकडे वळविल्याचे तसेच काही कर्जांसाठी नियमांपेक्षा अधिक रक्कम मंजूर केल्याचे आरोप आहेत.

निर्मल फूड प्रॉडक्ट्ससाठी एकूण 3.75 कोटी रुपयांचे कर्ज, फ्युचर फ्युएल्ससाठी 1 कोटी रुपयांचे कर्ज आणि पीएनजी कॉर्पोरेशनसाठी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा उल्लेख एसआयटीच्या तपासात आहे. तसेच एकाच मालमत्तेवर पुन्हा तारण ठेवून कर्ज घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

ठेवीदारांना आता स्पष्ट उत्तरांची प्रतीक्षा-
एका बाजूला एसआयटीच्या आरोपपत्रातील गंभीर निष्कर्ष आणि दुसऱ्या बाजूला संस्थेच्या प्रमुखांचा ‘परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत’ असा दावा यामुळे ठेवीदारांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

संस्थेकडे सध्या उपलब्ध निधी किती आहे, ठेवीदारांची एकूण देणी किती आहेत, उपलब्ध मालमत्तेतून किती निधी उभारता येऊ शकतो आणि ठेवीदारांना त्यांच्या रकमेची परतफेड करण्यासाठी नेमकी काय योजना आहे, याबाबत संस्थेने स्पष्ट माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे. मात्र, ‘आम्ही पैसे देण्याच्या परिस्थितीत नाही’ या संस्थेच्या प्रमुखांच्या वक्तव्यामुळे ठेवीदारांच्या चिंतेत आणखी भर पडली असून, आता संस्थेकडून ठोस आर्थिक माहिती आणि परतफेडीचा स्पष्ट आराखडा कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.