Published On : Thu, Jun 25th, 2020

नागपुरात कोण आहेत हे छोटे तुकाराम मुंढे ?

Advertisement

नागपूर : महानगरपालिका वर्तुळात तुकाराम मुंढे यांच्या आशीर्वादाने आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांची दादागिरी वाढत चालली आहे. आता तर ते स्वतःला तुकाराम मुंढे समजू लागले आहेत, असा आरोप सत्ताधारी बाकावरी ज्येष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी यांनी केला. डॉ. गंटावार यांचा उल्लेख “छोटे तुकाराम मुंढे’ असा करीत डॉ. प्रवीण आणि त्यांची पत्नी डॉ. शिलू चिमूरकर यांनी चालवलेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी तिवारी यांनी आज सभागृहात केली.

महाराष्ट्र नर्सिंग कायद्यानुसार महापालिकेत कार्यरत डॉक्‍टर खाजगी दवाखाना सुरू करू शकत नाही. मात्र, इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉ. शिलू चिमूरकर यांचे धंतोलीत खासगी रुग्णालय आहे. एवढेच नव्हे त्या महापालिकेच्या दवाखान्यात अनेक-अनेक दिवस अनुपस्थित राहातात. याबाबत त्यांना नोटीसही देण्यात आली आहे. त्यांचे पती महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर हेच त्यांची स्वाक्षरी मस्टरवर करीत असून या डॉक्‍टर दाम्पत्याला निलंबित करा, अशी मागणी तिवारी यांनी केली.

डॉ. प्रवीण गंटावार यांचा वारंवार “छोटा मुंढे’ असा उल्लेख करीत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर पुराव्यासह सडकून टिका केली. डॉ. गंटावार यांच्या पत्नी डॉ. शिलू चिमूरकर यांचा मध्यप्रदेशातही दवाखाना असून त्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या असल्याचे पुरावेही तिवारी यांनी सभागृहाला. कॉंगेस कार्यकर्त्या असल्यामुळे राजकीय दबावात तर आयुक्त मुंढे त्यांना पाठीशी घालत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी डॉ. शिलू चिमूरकर यांचे धंतोलीत कोलंबिया नावाचे खाजगी रुग्णालय आहे. नोकरीत असलेल्या डॉक्‍टरांना स्वतःच्या रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन करता येत नाही. याशिवाय डॉ. शिलू चिमूरकर या इंदिरा गांधी रुग्णालयातही अनुपस्थित राहतात. याप्रकरणी यापूर्वी त्यांना नोटीसही बजावण्यात आली. परंतु याबाबींकडे आयुक्तांचे लक्ष कसे जात नाही? असा सवाल करीत या डॉक्‍टरला निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी कॉंग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांनी पती व पत्नी दोघांनाही निलंबित करण्याची मागणी केली.

आयुक्तांच्या दाव्याची काढली हवा

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे शहरातील पाच हॉस्पिटलमधील बेड वाढविल्याप्रकरणी स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. मात्र, याच आरोग्य व्यवस्थेला खिळखिळे करण्याचे काम आयुक्तांनी केल्याचा आरोप तिवारी यांनी आकडेवारीसह केला. पाच हजार रुपये मानधन असलेले 46 डॉक्‍टरांना आयुक्तांनी कामावरून काढले. एवढेच नव्हे आयुक्तांनी इंदिरा गांधी रुग्णालय, सदर रोग निदान केंद्रासाठी तरतूद केलेल्या निधीत घट केली. वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 75 लाखांची केलेली तरतूद 10 लाखांवर आणून ठेवली, असे नमुद करीत आयुक्त दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नगरसेवकांच्या बदनामीला आयुक्तांची संमती
सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात नगरसेवकांची चोर, दहावी पास, कामचुकार अशी बदनामी सुरू आहे. विशेष म्हणजे तुकाराम मुंढे फालोअर्स पेजवर ही बदनामी सुरू आहे. मात्र, आयुक्तांकडून ही बदनामी रोखण्यासाठी कुठलीही हालचाल नाही. अर्थात आयुक्तांची नगरसेवकांच्या बदनामीला मूक संमती असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला. नाशिकमधील एक व्यक्ती ‘वुई तुकाराम मुंढे सपोर्टर्स’ नावाने फेसबूक पेज चालवित आहे. आयुक्त जिथे जातात, तेथील लोकांना तो ऍड करतो. याबाबतही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तिवारी यांनी केली.