नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच त्यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ‘रस्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.





