
नागपूर : गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित करण्याच्या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात मुस्लिम बांधवांनी सोमवारी आंदोलन करत मोर्चा काढला. संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून केंद्र सरकारकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनादरम्यान “हिंदू-मुस्लिम जिंदाबाद” तसेच “हिंदू-मुस्लिमांवरील राजकारण बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गोहत्येच्या मुद्द्यावर होणारे राजकारण थांबवून गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासोबत गायीचे वासरू भेट देण्याचाही निर्णय घेण्यात आला. विविध भागांतील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे बाबू खान यांनी सांगितले की, गोमाता ही भारतीय संस्कृती आणि कृषी व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. तिच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी तिला राष्ट्रीय पशू घोषित करणे आवश्यक आहे. तसेच गोमातेच्या नावावरून समाजात फूट पाडण्याऐवजी हिंदू-मुस्लिम ऐक्य मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या अनोख्या आंदोलनामुळे नागपुरात दिवसभर चर्चांना उधाण आले होते.




