Published On : Wed, Nov 28th, 2018

नागपूर मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला : भाजप नगरसेविकेचा दीर अटकेत

नागपूर : मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला केल्या प्रकरणात भाजपाच्या नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा दीर विक्की ठाकूर याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाची ठाण्यात तक्रार झाल्याच्या दोन महिन्यानंतर विक्कीला अटक केली आहे.

हल्ल्याची घटना २४ सप्टेंबरच्या रात्री घडली होती. मनपाचा वाहनचालक नीलेश कमल हाथीबेड २४ सप्टेंबरला रात्री हुडकेश्वरच्या शारदा चौक येथून कृत्रिम टँकमधून गणेश विसर्जनाचे निर्माल्य गोळा करण्यासाठी आला होता. त्यावेळी विक्की आपल्या साथीदारासोबत शारदा चौकात बसला होता. त्यांनी नीलेशला मारहाण केली होती. विक्की हा भाजपाच्या नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा दीर आहे. या घटनेमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये रोष होता.

हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला तसेच मारपीट केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कलम आणखी वाढविल्या होत्या. हुडकेश्वर पोलिसांनी विक्कीचा सहकारी प्रशांत कुर्रेवार, अतुल अग्रवाल, अभिजित चिटकुले, ऋषभ काळे तसेच एका अल्पवयीन युवकाला अटक केली होती. विक्की अटक टाळण्यासाठी न्यायालयाला शरण गेला होता.

सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाकडून त्याला कुठलीही मदत मिळाली नाही. त्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. विक्की फरार झाल्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला होता. त्याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. विक्कीच्या विरोधात यापूर्वी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.त्याला न्यायालयात सादर करून २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.