Published On : Tue, Dec 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपा निवडणूक: भाजप चौथ्या विजयाच्या तयारीत, काँग्रेसला पुनरागमनाची आशा

Advertisement

नागपूर :नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच उपराजधानीतील राजकीय वातावरण तापू लागले असून आता सर्वांचे लक्ष नागपूर महानगरपालिका निवडणुकीकडे लागले आहे. सलग तीन वेळा सत्तेवर असलेल्या भाजपसमोर चौथ्यांदा विजयाची संधी असून, ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपूर हे ‘होमटाऊन’ असल्याने भाजपकडून या निवडणुकीकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे. नगरपरिषद निवडणुकांतील घवघवीत यशानंतर भाजपमध्ये आत्मविश्वास वाढला असून, त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती, प्रभागनिहाय तयारी, संघटनात्मक मजबुती आणि उमेदवार निवडीवर सविस्तर चर्चा झाली. भाजपकडून ही निवडणूक ‘विकासाच्या अजेंड्यावर’ लढवली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. मेट्रो प्रकल्प, उड्डाणपूल, रस्ते विकास, स्मार्ट सिटी उपक्रम आणि पायाभूत सुविधांचा दाखला देत भाजप मतदारांसमोर जाण्याची तयारी करत आहे.

महानगरपालिकेच्या १५१ जागांपैकी १२० जागा जिंकण्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात असला तरी, मोठ्या प्रमाणावर इच्छुक असल्याने उमेदवारी वाटप हेच भाजपसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी अति आत्मविश्वास टाळत तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते.

दुसरीकडे, काँग्रेससाठी ही निवडणूक पुनरुज्जीवनाची संधी मानली जात आहे. नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी यंदा महापालिकेत ‘करिश्मा’ घडवण्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना मिळालेल्या कडव्या लढतीनंतर काँग्रेसचे मनोबल वाढले असून, त्याचा लाभ मनपा निवडणुकीत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बेरोजगारी, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था आणि तुंबणाऱ्या गटारांचे प्रश्न काँग्रेसकडून आक्रमकपणे मांडले जाण्याची शक्यता आहे.

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद अधिक असल्याने भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तर महाविकास आघाडीतही काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची विभागलेली ताकद यावेळी निर्णायक ठरणार नसल्याचे चित्र आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने १०८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर काँग्रेसला २९ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, दीर्घकाळ सत्तेत असलेल्या भाजपसमोर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे, तर विरोधकांसमोर सत्ताधाऱ्यांविरोधातील असंतोष मतांमध्ये रूपांतरित करण्याची संधी आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement