नागपूर :नागपूर शहराच्या अधिकृत भौगोलिक हद्दीची सुरुवात ज्या प्रभागातून होते, तो प्रभाग क्रमांक १ पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रभागात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. मात्र, झगमगत्या राजकीय प्रचाराच्या पलीकडे पाहिले असता, आजही येथील नागरिक मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करत असल्याचे वास्तव समोर येते.
उत्तर नागपूरमध्ये वसलेला प्रभाग क्रमांक १ केवळ प्रतीकात्मकदृष्ट्या नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सत्तासमीकरणे बदलली, आश्वासनांचा पाऊस झाला; मात्र अनेक भागांमध्ये विकासाची गती संथच राहिल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे.
बदलते राजकीय समीकरण-
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने या प्रभागातील चारही जागांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्या वेळी उत्तर नागपूरचे आमदार भाजपचे डॉ. मिलिंद माने होते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. उत्तर नागपूरचे विद्यमान आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत असल्याने काँग्रेसला या प्रभागात नवसंजीवनी मिळाली आहे. परिणामी भाजपसाठी हा प्रभाग यावेळी तितका सोपा राहिलेला नाही. बसपा, रिपाइं, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्ष मैदानात उतरल्याने बहुकोनी लढतीची शक्यता अधिक गडद झाली आहे.
लोकसंख्या आणि सामाजिक रचना-
प्रभाग क्रमांक १ ची लोकसंख्या सुमारे ६९ हजार ७९० इतकी असून, हा नागपूरमधील दाट लोकवस्तीचा भाग आहे. यामध्ये २१,८२३ अनुसूचित जाती व १,५२० अनुसूचित जमातीतील नागरिकांचा समावेश आहे. जरीपटका परिसरात सिंधी समाजाची मोठी वस्ती असून, या समाजाचा स्थानिक राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव राहिला आहे.
यासोबतच ओबीसी, मुस्लिम, ख्रिश्चन समाज तसेच उत्तर भारतातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांचीही मोठी संख्या आहे. या विविध सामाजिक घटकांमुळे मतदारांचे गणित गुंतागुंतीचे बनले असून, प्रत्येक पक्षाला सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष रणनीती आखावी लागत आहे.
वाद, आंदोलन आणि वाढते राजकीय तापमान-
नारा परिसरातील १३० एकर जागेवर प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय उद्यानाच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले आंदोलन प्रभागातील राजकारण तापवणारे ठरले आहे. दुसरीकडे, याच भागात गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त राज्य सरकारने आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमामुळेही प्रभाग राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला. या परस्परविरोधी घडामोडींमुळे जनमत विभागले गेले आहे.
मूलभूत समस्यांचा अजूनही विळखा-
इतक्या राजकीय घडामोडींनंतरही प्रभागातील नागरी प्रश्न सुटलेले नाहीत. स्थानिक नागरिकांच्या मते, विकास प्रामुख्याने जरीपटका परिसरापुरताच मर्यादित राहिला आहे.
– अनेक अंतर्गत रस्ते आजही खड्ड्यांनी भरलेले आहेत.
-जुनी व अरुंद नाले व्यवस्था वारंवार तुंबते, पावसाळ्यात सांडपाणी घरांमध्ये शिरते.
-अनधिकृत लेआऊट्समध्ये पाणीपुरवठा व ड्रेनेजची सोय अपुरी आहे.
-स्वच्छतेचा अभाव असून मोकळ्या जागा कचऱ्याचे ढिगारे बनल्या आहेत.
-सार्वजनिक वाहतूक अपुरी असून औद्योगिक भागांशी थेट संपर्काचा अभाव आहे.
-कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातून होणाऱ्या राख प्रदूषणामुळे आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत.
प्रभागाअंतर्गत येणारे परिसर –
मार्टिन नगर, विश्वास नगर, खुशी नगर, सुशीला लेआऊट, नारा गाव, म्हाडा कॉलनी, कुक्रेजा नगर, अमर ज्योती नगर, हुडको कॉलनी, एमआयजी कॉलनी, निर्मल कॉलनी, सीएमपीडीआय, नागसेन नगर, जरीपटका व जुना जरीपटका अशा अनेक वसाहती या प्रभागात येतात.
प्रभागनिहाय ‘हे’ उमेदवार देणार टक्कर –
प्रभाग १ अ :
भाजप – महेंद्र धनविजय
काँग्रेस – राजरत्न बनसोड
राष्ट्रवादी काँग्रेस – कार्तिक लारोकर
बसपा – जयेश गेडाम
रिपाइं – क्षितिज गायकवाड
प्रभाग १ ब :
भाजप – सुषमा चौधरी
काँग्रेस – सुनीता महल्ले
बसपा – सविता लांडगे
प्रभाग १ क :
भाजप – प्रमिला मथरानी
काँग्रेस – निर्मला बोरकर
अपक्ष – दीपाली बुटे
प्रभाग १ ड :
भाजप – विक्की कुकरेजा
काँग्रेस – सुरेश जग्यासी
जन बदलाव पार्टी – निखिलेश मेश्राम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – आशिष हाडगे
बसपा – मंगेश नागदेवे
दरम्यान प्रभाग क्रमांक १ मध्ये राजकीय महत्त्व वाढले असले, तरी विकासाचा ताळमेळ अजूनही बसलेला नाही. यावेळी मतदार केवळ आश्वासनांवर नव्हे, तर रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक आणि प्रदूषण यावर ठोस कृती करणाऱ्या उमेदवारांवर विश्वास ठेवणार असल्याचे चित्र आहे. नऊ वर्षांनंतर होणारी ही निवडणूक प्रभागासाठी केवळ राजकीय लढत नसून, विकासाची दिशा ठरवणारी ठरणार आहे.









