
नागपूर – महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या, 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, मतदारांनी मतदानापूर्वी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करणे अत्यावश्यक आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात होणार असून, मतदार ओळखपत्र नसले तरी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मतदानासाठी मतदार भारतीय नागरिक असणे, वय किमान 18 वर्षे पूर्ण झालेले असणे आणि संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत नाव नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच ज्या वॉर्डमध्ये मतदान करायचे आहे, त्या वॉर्डचा रहिवासी असणेही बंधनकारक आहे.
मतदारांनी आपले नाव तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mahasecvoterlist.in ला भेट देऊ शकतात. येथे महानगरपालिका हा पर्याय निवडून, जिल्हा व स्थानिक संस्था म्हणून बीएमसीची निवड केल्यानंतर पूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक टाकून तपशील पाहता येतो. याशिवाय बीएमसीच्या अधिकृत वेबसाइटवरही मतदार शोधाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
केंद्र निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या वेबसाइटवर EPIC क्रमांक टाकून मतदार आपला अनुक्रमांक, वॉर्ड क्रमांक आणि मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता जाणून घेऊ शकतात. स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मतदार हेल्पलाइन अॅप उपलब्ध असून, त्याद्वारेही मतदान केंद्राची माहिती सहज मिळू शकते.
ऑनलाइन माहिती मिळण्यात अडचण येत असल्यास नागरिक 1916 या बीएमसी सेंट्रल हेल्पलाइनवर किंवा 022-22754028 तसेच 9619512847 या बीएमसी निवडणूक सेलच्या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर प्रथम मतदाराचे नाव आणि ओळखपत्राची तपासणी केली जाईल. त्यानंतर मतदाराच्या बोटावर अमिट शाई लावण्यात येईल आणि ईव्हीएमद्वारे मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मतदारांना इच्छित असल्यास ‘नोटा’चा पर्यायही निवडता येणार आहे.
मतदार ओळखपत्र उपलब्ध नसल्यास, निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या 12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करून मतदान करता येणार आहे. यामध्ये पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, केंद्र किंवा राज्य सरकारने जारी केलेले ओळखपत्र, फोटो असलेले बँक पासबुक तसेच इतर शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्रांचा समावेश आहे.
बीएमसी निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.








