
नागपूर : विदर्भातील नागपूरसह अमरावती, अकोला आणि चंद्रपूर महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक रविवारी नागपूर येथील विभागीय कार्यालयात पार पडली. या बैठकीत उमेदवार निवडीवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, महायुती कायम राहणार असून भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होईल.
बावनकुळे यांनी विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये भाजप–महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. “चारही मनपांत ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह आणि दोन-तृतीयांश बहुमताने विजय मिळवू,” असा ठाम दावा त्यांनी केला.
शिवसेनेसोबतच्या युतीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे. अमरावतीत सकाळी स्वाभिमानी पक्षासोबत अंतिम चर्चा झाली असून शिवसेनेशीही संवाद सुरू आहे. ही चर्चा आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्री उशिरापर्यंत अंतिम टप्प्यात पोहोचेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एनसीपीसोबतच्या युतीविषयी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, अमरावती वगळता इतर सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे. अमरावतीत मात्र युतीबाबत वेगळी भूमिका असल्याचे त्यांनी सूचित केले.
दरम्यान, अमरावतीत शिवसेना अधिक जागांची मागणी करत असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. “शिवसेनेने काही जादा जागांची मागणी केली आहे. मात्र यावर सातत्याने चर्चा सुरू आहे. आज रात्रीपर्यंत या विषयावर अंतिम निर्णय होईल,” असेही त्यांनी सांगितले.








