नागपूर : नागपूर महानगरपालिकेवर भाजपने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सलग चौथ्यांदा सत्तेवर येत भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला. मात्र १२० जागांचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला १०२ जागांवरच समाधान मानावे लागले. तरीही स्पष्ट बहुमत मिळवत शहराच्या राजकारणावर भाजपने आपली पकड घट्ट केली आहे.
या निवडणुकीत शहराच्या राजकीय नकाशात काही महत्त्वाचे बदल दिसून आले. एमआयएमने जोरदार एन्ट्री घेतली, तर तब्बल दहा वर्षांनंतर मुस्लिम लीग पुन्हा मनपात दाखल झाली. दुसरीकडे, बसपाचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला असून काँग्रेसने मागील वेळेपेक्षा थोडी वाढ नोंदवली आहे.
भाजपला अपेक्षेपेक्षा कमी यश-
भाजपने यंदा मोठे लक्ष्य ठेवले होते; मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये घट झाली असून ६ जागा कमी मिळाल्या. तरीही बहुमताच्या जोरावर भाजपने सत्ता अबाधित ठेवली.
काँग्रेसची संथ वाढ-
काँग्रेसने यावेळी संख्याबळ वाढवले असले, तरी प्रचारातील कमकुवतपणा ठळकपणे दिसून आला. स्टार प्रचारकांची यादी असूनही वरिष्ठ नेते मैदानात दिसले नाहीत. उमेदवारी वाटपावरून असलेला नाराजीचा सूर आणि नेतृत्वाचा अभाव याचा थेट परिणाम निकालावर झाला.
एमआयएमचा राजकीय धक्का-
एमआयएमने ६ जागांवर विजय मिळवत अनेक प्रस्थापित समिकरणे ढवळून काढली. मुस्लिम लीगनेही पुन्हा मनपात प्रवेश करत आपले अस्तित्व दाखवले. मात्र बसपाचा गड मानल्या जाणाऱ्या आसीनगर झोनमध्ये या पक्षांना अडथळा आला.
बसपाची घसरण-
एकेकाळी मनपात मजबूत असलेल्या बसपाला यंदा मोठा फटका बसला. कार्यकर्त्यांमधील नाराजी, उमेदवारीवरून असलेले मतभेद आणि नेत्यांचा आत्मविश्वास यामुळे पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
ठाकरे गट, राष्ट्रवादी व शिंदे गटाची मर्यादित उपस्थिती-
शिवसेनेतील फूटीनंतरही ठाकरे गटाने आपली दोन जागा कायम ठेवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला एक जागा मिळाली, तर शिंदे गटाने भाजपच्या कमळावर लढत आपली राजकीय उपस्थिती नोंदवली.
विकासावरच शिक्कामोर्तब
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा परिणाम मतदारांच्या निर्णयात दिसून आला. शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, मेट्रो आणि विकासकामांवर मतदारांनी विश्वास दाखवला आहे.
संयमाचा सल्ला-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय साजरा करताना कार्यकर्त्यांना संयम राखण्याचा संदेश दिला. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरणे आणि नागपूरच्या समस्या सोडवणे हीच पुढील वाटचाल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना देत नागपूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.









