नागपूर – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात होताच भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. पहिल्या कलांमध्येच भाजपने बहुमताचा आकडा गाठत नागपूरमध्ये सत्ता स्थापनेच्या दिशेने भक्कम पावले टाकली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपचे तब्बल १०१ उमेदवार आघाडीवर असून काँग्रेसला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
काल शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. ही प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी महापालिका प्रशासनाने चोख तयारी केली आहे. निवडणूक कामकाजासाठी ३,५७९ कर्मचारी केंद्राध्यक्ष म्हणून, तर १०,७३७ कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निकालाकडे संपूर्ण नागपूर शहरासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, अंतिम निकालातून नागपूर महानगरपालिकेच्या सत्तेचे स्पष्ट चित्र आज समोर येणार आहे.









