नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू होताच पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजप विजयाच्या दिशेने भक्कम वाटचाल करत असून सध्या भाजपचे तब्बल ७४ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नागपूर महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याची शक्यता बळावली आहे.
काल शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. ही प्रक्रिया सुरळीत आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी महापालिका प्रशासनाने चोख तयारी केली आहे. निवडणूक कामकाजासाठी ३,५७९ कर्मचारी केंद्राध्यक्ष म्हणून, तर १०,७३७ कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
शहरातील ३८ प्रभागांमधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या ९९३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे. दरम्यान, नागपूरच्या लकडगंज प्रभागातील मतमोजणी केंद्रासह सर्व केंद्रांवर आवश्यक सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक सुविधा आणि कर्मचारी नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे.
मतमोजणीचे कल स्पष्ट होत असताना संपूर्ण शहरासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. अंतिम निकालात कोणत्या पक्षाच्या हाती नागपूर महानगरपालिकेची सत्ता जाणार, याचे स्पष्ट चित्र आज दिवसभरात समोर येणार आहे.









