नागपूर : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक काल शांततेत पार पडल्यानंतर आज मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. आज सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, ही प्रक्रिया सुरळीत आणि कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
निवडणूक कामकाजासाठी ३,५७९ कर्मचारी केंद्राध्यक्ष म्हणून, तर १०,७३७ कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. शहरातील ३८ प्रभागांमधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या ९९३ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, नागपूरच्या लकडगंज प्रभागातील मतमोजणी केंद्रावर प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक सुविधा आणि कर्मचारी नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्तही कडक ठेवण्यात आला आहे.
मतमोजणीच्या निकालाकडे संपूर्ण शहरासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, कोणत्या पक्षाला नागपूर महानगरपालिकेत सत्ता मिळणार याबाबत आज स्पष्ट चित्र समोर येणार आहे.









