
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक प्रक्रियेबाबत स्पष्टता देण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी नागपूर मनपा निवडणुकीसंदर्भातील सर्व महत्त्वाच्या बाबींची सविस्तर माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी जाहीर करण्यात आली असून, १५ डिसेंबर २०२५ पासून शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती आयुक्त चौधरी यांनी दिली. नागपूर महापालिकेतील ३८ प्रभागांमधून एकूण १५९ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. आयुक्त चौधरी म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शहराला १० झोनमध्ये विभागण्यात आले असून, प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी झोननिहाय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील, तर तहसीलदार, मनपा सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंते सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. नागपूर मनपाची अंतिम मतदार यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, शहरात एकूण २४ लाख ८३ हजार ११२ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५६ हजार १६६ महिला, १२ लाख २६ हजार ६९० पुरुष आणि २५६ इतर मतदारांचा समावेश आहे.
अंदाजे ३,१६७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून, अंतिम आकडे लवकरच निश्चित केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानासाठी सुमारे १८ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये तसेच पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. उमेदवारी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे आयुक्त चौधरी यांनी सांगितले.
राखीव जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी अर्ज केल्याची पोचपावती नामनिर्देशन अर्जासोबत सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. निवडणूक प्रक्रियेदरम्यान वाहन, सभा, मिरवणूक, लाऊडस्पीकर यांसारख्या परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ प्रणाली राबवली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी FST, SST आणि VST पथकांची स्थापना करण्यात येणार सून, निवडणूक जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी मनपा स्तरावर स्वतंत्र सनियंत्रण समिती कार्यरत राहील. महत्त्वाची बाब म्हणजे, नागपूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी झोननिहाय विशेष पथके नियुक्त केली जाणार असल्याची माहितीही आयुक्त अभिजीत चौधरी यांनी दिली. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीमुळे नागपूरसह राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी दिवसांत प्रचाराचा जोर वाढणार असल्याचे चित्र आहे.








