नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५साठीची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आज (१५ डिसेंबर २०२५) प्रसिद्ध करण्यात आली आहे. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार ही यादी नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने दिली आहे.
अहर्ता दिनांक १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या संबंधित विधानसभा मतदार याद्यांच्या आधारे प्रभाग क्रमांक १ ते ३८ साठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली होती. ही प्रारूप यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन आयोगाच्या आदेशान्वये प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करण्यात आल्या.
ही अंतिम मतदार यादी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयासह लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरू नगर, महाल, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर आणि मंगळवारी अशा सर्व क्षेत्रीय झोन कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच www.nmenagpur.gov.in या संकेतस्थळावरही नागरिकांना यादी पाहता येणार आहे.
अंतिम मतदार यादीनुसार नागपूर महानगरपालिकेतील एकूण मतदारांची संख्या २४,८३,११२ इतकी आहे. यामध्ये १२,५६,१६६ महिला, १२,२६,६९० पुरुष आणि २५६ इतर मतदारांचा समावेश आहे.
दरम्यान, मतदारांना आपल्या नावाची माहिती सुलभरीत्या शोधता यावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर सर्च इंजिनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या वेबसाइटवर भेट देऊन मतदार आपले नाव कोणत्या प्रभागात समाविष्ट आहे, याची खात्री करू शकतात.
ही माहिती उपायुक्त (साप्रवि/निवडणूक), नागपूर महानगरपालिका यांनी दिली आहे.








