Published On : Sat, Mar 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा!

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
Advertisement

नागपूर : शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी सर्व प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मनपाच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीला मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये तसेच मुख्यालय आणि विविध झोनमधील कार्यकारी अभियंते उपस्थित होते. शहरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांची माहिती अधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर सादर केली.

बैठकीत शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे, बाळासाहेब ठाकरे प्राथमिक शिक्षण, कला व सांस्कृतिक केंद्र, मिनीमाता नगर येथील ३० खाटांच्या दवाखान्याचे बांधकाम, नंदनवन परिसरातील श्री लक्ष्मीनारायण व शिव मंदिर संकुल सुशोभीकरण तसेच कुत्तेवाला बाबा मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मासळी बाजार उभारणी, भांडेवाडी येथे श्वान निवारा व चिकित्सा केंद्र, जिजाऊ स्मृती शोध संस्थानचे बांधकाम, मनपा मुख्यालयाचे मुख्य द्वार, संरक्षण भिंत व सौंदर्यीकरण, जयताळा येथे कार्यरत महिलांसाठी वसतीगृह तसेच ‘हेल्दी स्ट्रीट प्रोग्राम’ अंतर्गत शंकर नगर व धरमपेठ परिसरातील रस्त्यांचे अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार सुधारणा या प्रकल्पांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.

तसेच महाल येथील स्व. प्रभाकररावजी दटके रुग्णालय इमारत, श्रीमंत राजे रघुजीराव भोसले टाऊन हॉल, वाठोडा व भांडेवाडी येथील ‘नंदग्राम’ गोठे प्रकल्प, मोमिनपुरा येथील अत्याधुनिक ई-लायब्ररी, वाहतूक व पार्किंग व्यवस्थेतील सुधारणा, साईनेज सिस्टीम, बुधवार बाजार व्यावसायिक संकुल, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, सक्करदरा भवन व्यावसायिक संकुल, गांधीबाग प्रकल्प, पारडी व्यावसायिक संकुल, भाजीपाला-मटण मार्केट आणि एकात्मिक निदान व डायलिसिस केंद्र या विविध प्रकल्पांचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले.

Advertisement

प्रकल्पांची माहिती घेतल्यानंतर आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगितले. तसेच मनपाच्या सर्व झोन कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्याबरोबरच विविध प्रकल्पांच्या इमारतींवर सौरऊर्जा प्रणाली (सोलर सिस्टम) बसविण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पुढील बैठकीत प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणींचा सखोल आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.