भतिजाचा चाचा कोण हे अधिवेशनात उघड करू, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

नागपूर – नवी मुंबईतील सिडकोतील जमिनीच्या व्यवहारावरून आरोपांची फैर झाडणाऱ्या काँग्रेसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. सिडकोतील जमिनीच्या व्यवहाराच्या चौकशीस आपण तयार असून, सभागृहात हा विषय चर्चेला आल्यावर मागच्या सरकारमध्ये या भतिजांचे चाचा कोण होते याची माहिती दिली जाईल.

कुणी कुणी काय वाटप केले हे उघड केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.

उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विविध मुद्द्यांवर सरकारची बाजू मांडतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या सिडकोतील जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याच्या आरोपांनाही उत्तर दिले.

सिडकोतील भूखंड घोटाळ्याच्या आरोप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण तयार आहोत. तसेच याबाबत सभागृहात चर्चेलाही सरकार तयार आहे. हा मुद्दा चर्चेला आला की मागच्या सरकारमध्ये बिल्डर भतीज्यांचे चाचा कोण होते हे चर्चेदरम्यान समोर आणू . कोणी काय काय वाटप केले हे समोर आणू, असा इशारा मुख्यमंत्रांनी दिला.