पावसामुळे अभूतपूर्व परिस्थिती; अद्याप केंद्राची मदत का नाही?: विखे पाटील

नागपूर: पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना अद्याप केंद्राकडून मदत का आलेली नाही? अतिवृष्टीग्रस्त भागाची हवाई पाहणी का झालेली नाही? लष्कराला सतर्कतेचे आदेश का देण्यात आलेले नाहीत? असे अनेक प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सरकारसमोर उपस्थित केले.

मंगळवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून मुंबई, कोकण, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतरही विभागात मागील अनेक तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहर जलमय झाले तेव्हा संपूर्ण सरकार नागपूरमध्ये हजर असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवले. पण हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा हा वेग मुंबई शहरात दिसून येत नाही. संपूर्ण मुंबई ठप्प झाल्याचे चित्र असून, पुढील काही तास पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारीच्या काय उपाययोजना केल्या आहेत? केंद्राकडून मदत मागण्यात आली आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.

पावसाळी अधिवेशनामुळे सर्व पालकमंत्री आणि आमदार सध्या नागपुरात आहेत. अशा गंभीर परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री मुख्यालयी हजर असतील तर प्रशासनावर धाक राहतो. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना आणि आमदारांना मुख्यालयी पाठविण्याबाबत सरकारने निर्देश द्यावेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या सर्व उपाययोजनांमध्ये सरकारला संपूर्ण सहकार्य करायला विरोधी पक्ष तयार आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. सध्या सर्वत्र अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पावसामुळे पालक व विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्यासंदर्भातही विखे पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.