
नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याचा आरोप असून, पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसूती झाली. त्यानंतर प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. जबाबात मुलीने सांगितले की, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने रीतिरिवाजानुसार तिचा विवाह २८ वर्षीय तरुणासोबत लावून देण्यात आला होता. विवाहानंतर ती सासरी राहत होती.तपासादरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्या कुटुंबीयांसह अन्य आरोपींनी तिचा विवाह संबंधित तरुणासोबत लावून दिल्याचे समोर आले.
विवाहानंतर आरोपी पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यातून ती गर्भवती झाली आणि नंतर तिने एका बाळाला जन्म दिला.या प्रकरणी पतीसह अन्य चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तहसील पोलीस पुढील तपास करीत आहेत.




