उपराजधानीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, तसेच राज्य शासनाच्या विविध कार्यालयांना एकत्रित कामकाज करता यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 271 कोटीचे भव्य प्रशासकीय भवन उभे राहत आहे. या जिल्हयाच्या ठिकाणी उभ्या राहत असलेल्या मिनी मंत्रालयाच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्याचे स्पष्ट केले होते. महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरात सर्व प्रशासकीय कार्यालय एका इमारतीत आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असावेत यासाठी त्यांनी या प्रस्तावांवर सर्वकष चर्चेसाठी विविध स्तरावरील बैठका घेतल्या होत्या. या इमारतीमध्ये विभागीय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय प्रामुख्याने असतील तसेच, दोन्ही प्रमुख कार्यालयाच्या अंतर्गत असणारे अनेक कार्यालयदेखील यामध्ये समाविष्ट असणार आहेत. महाराष्ट्रातील एक देखणी इमारत नागपूरमध्ये उभी होत असून ती वेळेत उभी राहणार आहे.

