Published On : Mon, Jul 16th, 2018

Nagpur: दुधाची पिशवी विकणाऱ्याला जेवढे कमिशन मिळते तेवढेही शेतकऱ्याला मिळत नाही – अजित पवार

Advertisement

Ajit-Pawar

Nagpur: (नागपूर) जे दुध तयार करुन पिशवीतून किंवा बाटलीतून मुंबईला जाते तिथे विक्री करणाऱ्याला ५ रुपये कमिशन मिळते परंतु आमच्या शेतकऱ्याला लिटरला जेवढा खर्च येतो तेवढे देखील मिळत नाही ही आजच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची शोकांतिका झाली आहे अशी खंत विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

दुधाला जास्तीचा दर मिळत नसल्याने राज्यातील दुध उत्पादकांनी आंदोलन पुकारले आहे त्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून लक्ष वेधतानाच सरकारवर जोरदार हल्लाबोल केले. मिडियाशी बोलताना सरकारच्या दुटप्पी धोरणावर अजितदादांनी प्रहार केला.

आज विरोधी पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याला गायीचे दुध तयार करण्यासाठी २५ ते ३० रुपये लिटरला खर्च येतो आणि त्यातून शेतकऱ्याला १७ ते २१ रुपये मिळतात. सरकार जी काही घोषणा करते त्याची अंमलबजावणी नीट करत नाही आणि त्याचा फायदाही शेतकऱ्याला होत नाही. त्यामुळे कर्नाटक आणि गोवा राज्य दुधाला लिटरला ५ रुपये थेट अनुदान देते तसं अनुदान महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकऱ्याला थेट देण्यात यावे अशी मागणी अजितदादांनी केली.

भाजप सरकार दुध संघाचे लोक चुकीचं वागत आहेत असे सांगत आहेत परंतु गेली चार वर्ष हे सरकार सत्तेवर आहे. मात्र काही अडचण आली की सहकारी चळवळीच्या नावाने बोटे मोडण्याचे काम करत आहे असाही आरोप अजितदादांनी केला.

त्यांनी यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील औरंगाबाद येथे सुरु असलेल्या दुध सहकारी संघांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी दुधाला २१ रुपये दर देत असल्याचे सांगितले. हे कशाचे दयोतक आहे असा सवालही अजितदादांनी केला.

गेली पावणे तीन वर्षे आम्ही सरकारकडे दुधाला लिटरला ३० रुपये भाव देण्याची मागणी करत आहोत. परंतु सरकार त्याकडे लक्ष देत नाही असेही अजितदादा म्हणाले.

खासदार राजु शेट्टीदेखील या सरकारच्याविरोधात गेले आहेत. त्यामुळे त्यांचे आंदोलन मोडण्याचा डाव हे सरकार आखत तर दुसरीकडे खाजगी दुध संघाच्या लोकांना फोन करुन ३ रुपये वाढवून दिल्याचे प्रेस घेवून सांगा अन्यथा आम्ही जाहीर केलेले ५० रुपयेही रद्द करु अशी धमकी सरकारच्यावतीने दिली जात आहे अशा पध्दतीने सत्तेचा गैरवापर भाजप सरकार करत असल्याचा आरोपही अजितदादांनी केला.