Published On : Tue, Jan 4th, 2022

नागपूर मेट्रोचा प्रवास, सुरक्षित प्रवास…!

Advertisement

‘मेट्रो संवाद’च्या माध्यमातून शहरातील लोकांपर्यंत पोचतेय माझी मेट्रो

नागपूर : महा मेट्रोने २०२१ या वर्षभरात कोरोनाचे सावट असतांना देखील या कठीण परिस्थितीत यशस्वीरीत्या अनेक महत्वपूर्ण कार्य पार पाडत नागरिकांना अविरत मेट्रो सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. लवकरच रिच २ ( सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन) व रिच ४ (सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन) दरम्यान मेट्रो सेवा सुरु होणार असून त्या संबंधीचे कार्य महा मेट्रोच्या वतीने केल्या जात आहे. नुकतेच महा मेट्रोने सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर सिताबर्डी इंटरचेंज ते वैष्णो देवी चौक मेट्रो स्टेशन दरम्यान पहिली टेस्ट रन घेतली असून लवकरच या भागातील नागरिकांना मेट्रोने प्रवास करायला मिळणार आहे. याच अनुषंगाने या मार्गिकांवरील नागरिकांना मेट्रो संबंधी माहिती देण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी मेट्रो संवाद कार्यक्रम महामेट्रो नागपूरच्या वतीने राबवला जात आहे.

मेट्रो संवाद घेण्याचा मुख्य उद्देश भविष्यातील प्रवाश्यांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि शंकांचे निरसन करणे आहे, त्यासोबतच नागपूर मेट्रोच्या प्रवाश्यांसाठी असलेले सामान्य नियम, स्थानकांवर असलेल्या सोयी-सुविधा, तिकीट दर, फीडर सेवा, मल्टिमोडेल इंटिग्रेशनच्या माध्यमाने केलेल्या उपाययोजना, व्यावसायिक संधी अश्या विविध विषयांवर माहिती देऊन चर्चा केली जाते. महा मेट्रोचे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी मेट्रो संवादाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्याशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करतात. यात जनसंपर्क विभाग, मल्टिमोडेल इंटिग्रेशन, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन & मेंटेनन्स विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतात.

आजवर नागपूर मेट्रोचे एकूण १५० च्या वर मेट्रो संवाद शहरात आणि १५ मेट्रो संवाद विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आले आहे. लॉकडाऊन संपून सगळं नियमित झाल्यापासून, आणि उर्वरित २ मार्गिका सुरु होण्याची चाहूल लागल्यापासून मागल्या महिनाभरात नागपूर मेट्रोने डझनभर मेट्रो संवाद केले आहेत. त्यात सेवासदन शाळा, सीताबाई नरगुडकर नर्सिंग महाविद्यालय, भिलगाव ग्रामपंचायत, सेंट्रल रेल्वे पार्सल ऑफिस, प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टेकडी ग्राम, कन्हान आणि नागपूर रेल्वे स्टेशन येतील मेट्रो संवाद उल्लेखनीय ठरले.