मेट्रो ट्रेन मध्ये सांता क्लॉज साधणार लहान मुलांशी संवाद*
नागपूर : रायडरशिप वाढवण्याच्या दृष्टीने महा मेट्रोच्या वतीने मेट्रोतून ३१ डिसेंबर पर्यंत कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या दिनांक २५ डिसेंबर (रविवार) रोजी मेट्रो स्टेशनवर आकर्षक कार्यक्रमाची मेजवानी मेट्रो स्टेशनवर करण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्व मेट्रो स्टेशनवर ख्रिसमस ट्री लावण्यात आली आहे तसेच सायंकाळी झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशनवर संगीतच कार्यक्रमाचे आयोजन तसेच स्टेशनवर फूड स्टॉल असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहे. या सोबतच सांता क्लॉज विशेषतः लहान मुलांशी संवाद साधणार आहे. नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्या मध्ये झपाट्याने वाढ झाली असून मोठ्या प्रमाणात नागरिक याचा वापर करीत आहे.
या सोबतच जुनी नाणी, स्टॅम्प संग्रह, आता कालातीत झालेल्या एलपी रेकॉर्ड्स, अतिशय दुर्मिळ आणि जुन्या आगपेटीचे आवरण, अश्या कार्यक्रमांची देखील भर राहणार आहे. नाताळच्या निमित्ताने देखील कार्निव्हल आणि इतर कार्यक्रमांची भर पडणार असून एकूण अश्या प्रकारे विविध कार्यक्रमांची मेजवानी नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. मेट्रो प्रवास सुरक्षित आणि आरामदायक तर असतोच पण त्या शिवाय तो रंजक देखील असावा हा नागपूर मेट्रोचा प्रयत्न आहे. सरणाऱ्या वर्षाला समारोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या माध्यमाने होणार आहे.
या कार्यक्रमात विविध स्थानिक कंपन्या आणि व्यवसायी संस्था सहभागी झाल्या आहेत. नागपूरकरांनी मेट्रोने राईड करत या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा हे आवाहन नागपूर मेट्रो तर्फे केले जात आहे.तसेच जादूचे प्रयोग, गीत-संगीताचे कार्यक्रम, मेट्रो संवाद सारखे कार्यक्रम आयोजित होत आहेत.