नागपूर : शहरातील नामांकित मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड (Meditrina Institute of Medical Sciences Pvt. Ltd.) या खासगी रुग्णालयात तब्बल २ कोटी ३१ लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे उघड झालं असून, सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई आयकर सल्लागार गणेश रामचंद्र चक्करवार (वय ६६) यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. चक्करवार हे मेडिट्रीना हॉस्पिटलचे सह-संस्थापक तसेच माजी चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, कंपनीचे विद्यमान संचालक डॉ. समीर नारायण पालतेवार, सौ. सोनाली पालतेवार, निनाद पालतेवार, पौलोमी पालतेवार आणि अर्पण पांडे यांनी संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
चक्करवार यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय योजनांमधून रुग्णालयाला येणारा निधी हा जाणूनबुजून ‘ऑब्वीयेट हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’ (Obviate Healthcare Pvt. Ltd.) या बोगस कंपनीच्या खात्यात वळवण्यात आला. ही कंपनी पालतेवार कुटुंबीयांचीच असून, ती केवळ कागदोपत्री अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर व्यवहार १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पार पडल्याचा आरोप आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत उपचार केलेल्या रुग्णांच्या बिलांचा निधी या शेल कंपनीच्या खात्यात वळवण्यात आला, असा तपासात प्राथमिक निष्कर्ष आहे.
तक्रारदारांच्या मते, मेडिट्रीना हॉस्पिटलचे अधिकृत एचडीएफसी बँक खाते (HDFC Bank, धंतोली शाखा) वगळून रक्कम थेट ऑब्वीयेट हेल्थकेअर प्रा. लि. च्या रामदासपेठ शाखेतील खात्यात जमा करण्यात आली. त्यामुळे हॉस्पिटल आणि शासन या दोघांनाही लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या गंभीर प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम 3(5), 61, 316, 318(4), 336(3), 340(2) आणि 344 अंतर्गत गुन्हा नोंदविला असून, सपोनि ज्योत्सना भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
या घोटाळ्यामुळे नागपूरच्या आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मेडिट्रीना हॉस्पिटल हे शहरातील अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी ओळखले जाते आणि राज्यातील विविध शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचार घेत असतात.