नागपूर : शहरातील आरोग्य क्षेत्र हादरवून सोडणारा मोठा आर्थिक गैरव्यवहार मेडीट्रीनाचे संचालक गणेश रामचंद्र चक्करवार (वय ६५, रामदासपेठ, नागपूर) यांच्या तक्रारीवरून उघडकीस आला आहे. मेडीट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे व्ही.आर.जी. हेल्थकेअर प्रा. लि.) या हॉस्पिटलमध्ये तब्बल १६ कोटी ८३ लाखांहून अधिक रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक आरोप नोंदवला गेला आहे.
सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR क्रमांक 0833/2025 नुसार, कंपनीचे संचालक डॉ. समीर पालतेवार व त्यांची पत्नी सोनाली पालतेवार यांनी संगनमताने कंपनीच्या निधीचा अपहार केला. या गैरव्यवहारात हॉस्पिटलचे काही कर्मचारी व इतर व्यावसायिक मिळून एकूण १८ जण आरोपी करण्यात आले आहेत.
तक्रारदाराची भूमिका-
तक्रारदार गणेश रामचंद्र चक्करवार (वय ६५, रामदासपेठ, नागपूर) मेडीट्रीना संचालक
यांनी पोलीसांना दिलेल्या रिपोर्टनुसार, २००६ मध्ये मेडीट्रीना हॉस्पिटलची स्थापना झाली. सुरुवातीला ते आणि डॉ. समीर पालतेवार हे ५०-५० टक्के भागीदार होते. मात्र, २०१७ नंतर तात्पुरती स्वरूपात पालतेवार यांच्याकडे बहुसंख्य शेअर्स आले आणि त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार सुरू झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
आर्थिक गैरव्यवहाराची स्वरूपे-
२०२० ते २०२४ या कालावधीत हॉस्पिटलच्या बँक खात्यातून ११.४१ कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.
डिजिटल मार्केटिंग, जाहिरात व कन्सल्टन्सीच्या खोट्या बिलांच्या माध्यमातून ५.४२ कोटी रुपये विविध खात्यांमध्ये हलवले गेले.
अशा प्रकारे एकूण १६,८३,७८,९१५ रुपये कंपनीतून काढून वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे.
आरोपींमध्ये कोण?
डॉ. समीर पालतेवार सोनाली पालतेवार निनाद पालतेवार तसेच अर्पण पांडे, सर्वेश ढोमणे, आकाश केदार, रिता मुकेश बडवाईक, वैशाली बडवाईक, तृप्ती घोडे, रीता बडवाईक, कल्याणी बडवाईक, नईम दिवाण, प्रियंका ढोमणे यांच्यासह काही आरोग्य सेवा व IT कंपन्यांचे संचालक यांचा समावेश आहे.
पूर्वीही गुन्हे दाखल-
यापूर्वीही डॉ. समीर पालतेवार यांच्या विरोधात २०१९ आणि २०२१ मध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्या दोन्ही प्रकरणांत न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. हे सर्व सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट असून सध्या ते जामिनावर आहेत.
पोलीस कारवाई-
याप्रकरणी IPC कलम ४०९, ४०६, ४२० आणि १२०(B) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तपास आर्थिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.