नागपूर : नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारडी ते विहीरगाव बाह्यवळण मार्गावरील गौरी फॅमिली गार्डन रेस्टॉरंटसमोर सर्व्हिस रोडलगत सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून २५ ग्रॅम एमडी सदृश्य पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी दुपारी १.१० ते ३ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी एजाज अहमद शेख अहमद (वय ३५, रा. हसनबाग, नागपूर) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम एमडी सदृश्य पावडर, २५ हजार रुपये किमतीचा नथिंग कंपनीचा मोबाईल आणि अंदाजे एक लाख रुपये किमतीची एसेस मोपेड जप्त करण्यात आली.
या प्रकरणात शाहरुख अहमद सगीर अहमद (वय २६), सिराज अहमद सगीर अहमद (वय २४) आणि मोहम्मद अबरार अन्सारी (वय २५) हे तिघे संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. यापैकी काही आरोपींविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८(क), २२(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपासासाठी प्रकरण वाठोडा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
या कारवाईदरम्यान सायबर पथकाचे विशेष सहकार्य लाभले. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





